रविवारचा चहा क्रमांक- २०६
हास्य जगण्याची ओळख...
"स्मितहास्य" दिसायला फक्त दोन ओठांची एक छोटीशी हालचाल, पण तिचा प्रभाव मात्र अनंत विश्वाएवढा मोठा असतो.
आजच्या डिजिटल युगात आपण एका गोष्टीचे पक्के सरावलेले झालो आहोत, कॅमेरा समोर आला की लगेच चेहऱ्यावर एक दोन सेकंदांची स्माईल आणायची आणि फोटो क्लिक झाला की, चेहरा परत पूर्ववत करायचा. याला आपण 'इन्स्टंट स्माईल' म्हणू शकतो.
पण अनुभवाच्या शाळेत शिकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, चेहऱ्यावरची खरी 'Smile' ही केवळ फोटोग्राफीसाठी दिलेली दोन सेकंदांची पोज नव्हे, तर ती तुमच्या जगण्याची स्टाईल असली पाहिजे.
आयुष्यात चढ-उतार येतच राहतात. अशा वेळी रडत बसण्यापेक्षा, परिस्थितीच्या तोंडावर मारलेली एक आश्वासक 'Smile' संकटाचा अर्धा जोर कमी करते. ते हास्य परिस्थितीला ठणकावून सांगते, "तू मला त्रास देऊ शकतेस, पण माझा आनंद हिरावू शकत नाहीस."
कधीकधी नात्यांमध्ये गैरसमज आणि अहंकार येतो. अशा वेळी तासन् तास वाद घालण्यापेक्षा, दिलेली एक प्रामाणिक 'Smile' बऱ्याच गोष्टी निस्तरून नेते. फोटोतली पोझ सोशल मीडियावर काही 'Likes' मिळवून देईल; पण तुमच्या जगण्याची हसमुख स्टाईल लोकांना तुमच्या प्रेमात पाडेल आणि तुटलेली नाती जोडून ठेवेल.
हास्याला 'लाईफस्टाईल' बनवल्यास स्वतःवरचा विश्वास वाढतो. कोणत्याही महत्त्वाच्या प्रसंगी चेहऱ्यावरचे हास्य अर्धी लढाई आधीच जिंकवून देते. तसेच, हसण्यामुळे शरीरात 'हॅपी हार्मोन्स' तयार होतात, जे मनाचा ताण हलका करून आपल्याला नेहमी तरुण व उत्साही ठेवतात.
एक फोटो चांगला येण्यासाठी फक्त दोन सेकंद हसावं लागतं, मग विचार करा. जर संपूर्ण आयुष्य हसतमुख राहून जगलो, तर आयुष्य किती सुंदर होईल.
चला तर मग, फोटोग्राफीच्या दोन सेकंदांच्या चौकटीतून बाहेर पडूया. उद्या सकाळी आरशात पाहताना स्वतःला एक छान स्मितहास्य द्या आणि हसणे ही आपल्या जगण्याची हक्काची स्टाईल बनवा.
नेहमी हसत राहा!
प्रा.दिलीप आनंदराव जाधव,सांगली
सचिव
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.
आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...
बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:
डॉ. राजदत्त रासोलगीकर
मुख्य संपादक
मो. 9923393329
आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

0 Comments