Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळमध्ये घरकुल लाभार्थ्यांच्या वाळूसाठी JCB परवानगीची मागणी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर आत्मदहनाचा इशारा...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना सिना नदीपात्रातून देण्यात येणारी वाळू ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी JCB व पोकलेनला परवानगी द्यावी, अन्यथा २ जून रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आत्मदहन करणार असल्याचा इशारा डिजिटल शेतकरी संघटना शिरापूर (सी) चे संस्थापक अध्यक्ष अनिल अबाजी पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, तहसीलदार मोहोळ, सदर बाजार पोलीस स्टेशन व मोहोळ पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, मोहोळ तालुक्यातील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना सिना नदीतील मौजे आष्टे येथील गट क्रमांक १६७ मधून प्रत्येकी ५ ब्रास वाळू देण्यात येत आहे. मात्र सद्यस्थितीत ही वाळू मनुष्यबळाच्या सहाय्याने ट्रॅक्टरमध्ये भरली जात असून, वाढत्या उन्हामुळे व ४० ते ४५ अंश तापमानामुळे मजूर मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

सदर वाळू JCB द्वारे ट्रॅक्टरमध्ये भरण्यासाठी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची तोंडी परवानगी असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. मात्र आदेशात ‘मनुष्यबळाने वाळू भरावी’ अशी अट असल्याने यंत्रसामग्री वापरण्यास अडथळे निर्माण होत असल्याचे म्हटले आहे.

तसेच जिल्ह्यात ज्या ठिकाणी वाळू लिलाव सुरू आहेत, त्या ठिकाणी JCB व पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप करत, घरकुल लाभार्थ्यांनाच यंत्रसामग्री वापरण्यास मज्जाव का केला जात आहे, असा सवालही अनिल पाटील यांनी उपस्थित केला आहे. जर घरकुल लाभार्थ्यांना JCB वापरण्यास परवानगी दिली जात नसेल, तर जिल्ह्यातील सर्व वाळू लिलाव ठिकाणी सुरू असलेला JCB व पोकलेनद्वारे वाळू उपसा तात्काळ बंद करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, मागणी मान्य न झाल्यास मंगळवार दि. २ जून २०२६ रोजी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आत्मदहन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.



Post a Comment

0 Comments