गंगेवाडी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील खडी क्रशर उद्योगांबाबत माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गावात सुमारे 18 ते 20 खडी क्रशर कार्यरत असून त्यापैकी केवळ 5 ते 6 क्रशरकडे आवश्यक शासकीय मान्यता असल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांवरून समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. उर्वरित खडी क्रशरच्या परवानग्यांबाबत स्पष्टता नसल्याने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित खडी क्रशरची स्थापना सन 2009-10 दरम्यान झाल्याचे दिसून येते. मात्र, स्थापनेपासून सन 2022-23 पर्यंत गंगेवाडी ग्रामपंचायतीमार्फत कर वसुली झाल्याची नोंद उपलब्ध नसल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर गंगेवाडी ग्रामपंचायत, तत्कालीन ग्रामसेवक, महसूल विभागातील संबंधित अधिकारी आणि तत्कालीन तहसीलदार यांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू असताना कर वसुली का झाली नाही, परवानग्यांची तपासणी झाली का, तसेच नियमांचे पालन झाले का, याबाबत चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या प्रकरणात संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. तसेच शासनाचा नेमका किती महसूल बुडाला, याची स्वतंत्र पडताळणी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सन 2010 पासून कर वसुली न झाल्याचा दावा कितपत सत्य आहे, परवानगी नसल्याचा दावा करण्यात आलेल्या खडी क्रशरची वस्तुस्थिती काय आहे आणि याबाबत संबंधित विभागाने कोणती कारवाई केली आहे, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
या प्रकरणातील माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रे, संबंधित नोंदी आणि इतर पुराव्यांच्या आधारे बातमीच्या पुढील भागात अधिक माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. एकंदरीत गंगेवाडीतील खडी क्रशर प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.



0 Comments