🌞 मनाच्या गाभाऱ्यातून..!
धान्यतुला व सुवर्णपुष्प वर्षावाने मुक्ताबाई लिंबोळे यांचा ८५ वा वाढदिवस उत्साहात संपन्न...
वडार समाजातील विशेषतः महिला चोळी चळवळीचे प्रणेते स्वर्गीय काशीराम लिंबोळे यांच्या सुनबाई श्रीमती मुक्ताबाई अर्जुन लिंबोळे यांचा ८५ वा वाढदिवस विविध प्रेरणादायी व सामाजिक उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
लिंबोळे परिवाराने आपल्या मातोश्रींच्या वाढदिवसानिमित्त केवळ कौटुंबिक समारंभ न ठेवता समाजातील नागरिक, मित्रपरिवार व मान्यवरांचा सहभाग घेऊन अशोक चौक येथील वीर बजरंगबली मारुती मंदिरासमोरील मंडपात भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. सामाजिक बांधिलकी, कुटुंबसंस्कार आणि ज्येष्ठांविषयीचा आदर यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुक्ताबाई लिंबोळे यांची पारंपरिक पद्धतीने ८५ दिव्यांनी ओवाळणी करण्यात आली. त्यांच्या जीवनप्रवासाला आणि कर्तृत्वाला अभिवादन म्हणून सुवर्णपुष्पांचा वर्षाव करण्यात आला. दीपांच्या प्रकाशातून व्यक्त करण्यात आलेली ही कृतज्ञता आणि मानवंदना उपस्थितांच्या मनाला स्पर्शून गेली.
यानंतर मुक्ताबाई लिंबोळे यांच्या वजनाइतक्या धान्याची धान्यतुला करण्यात आली. हे संपूर्ण धान्य गरजू व गोरगरीब कुटुंबांना वाटप करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून समाजोपयोगी कार्य करण्याचा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद ठरविला.
त्यानंतर वाढदिवसाचा केक कापण्यात आला व उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. महिला वर्गाच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा समाजातील संस्कृती, कुटुंबमूल्ये आणि मातृपूजेचा आदर्श ठरला.
आजच्या काळात स्वतःचे किंवा मुलांचे वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरे करण्याची परंपरा वाढत असताना, ज्यांनी आपल्याला जन्म दिला, संस्कार दिले आणि आयुष्य घडवले त्या आई-वडिलांचा वाढदिवस अशा गौरवपूर्ण पद्धतीने साजरा करणारी उदाहरणे फारच कमी दिसतात. लिंबोळे परिवाराने आपल्या मातोश्रींचा वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
आईच्या शब्दांत सत्याची ताकद असते. मुला-मुलींच्या यशासाठी स्वतःचे आयुष्य अर्पण करणारी, नाती-नातवंडांसाठी मायेची सावली बनणारी, संकटसमयी अभेद्य संरक्षण कवच ठरणारी आई ही देवापेक्षाही श्रेष्ठ असते. आई-वडिलांचा सन्मान करा, त्यांना प्रेम, आदर आणि जिव्हाळ्याची वागणूक द्या, त्यांची मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य करू नका, असा हृदयस्पर्शी संदेश या वाढदिवस सोहळ्यातून देण्यात आला.
हा संस्मरणीय कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिंबोळे परिवारातील मुले, मुली, जावई, सुना तसेच नातवंडांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी मुक्ताबाई लिंबोळे यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
— रवी देवकर









0 Comments