सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | ‘पे बॅक टू सोसायटी’ ही संकल्पना समोर ठेवून कार्यरत असलेल्या सम्यक अकॅडमीच्या मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या वतीने स्पर्धा परीक्षांसंदर्भातील मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
यावेळी अकॅडमीचे मार्गदर्शक तथा राज्यकर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. स्पर्धा परीक्षांचे स्वरूप, अभ्यासक्रम, आवश्यक संदर्भ पुस्तके, अभ्यासाचे नियोजन आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक बाबींबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
सम्यक अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक गरजू आणि होतकरू स्पर्धकांना मोफत मार्गदर्शनाचा लाभ मिळाला आहे. या मार्गदर्शन केंद्रातून तयारी केलेले अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेत रुजू झाले असून, समाजातील वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी ही अकॅडमी आशेचा किरण ठरत आहे.
स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य नियोजन, सातत्य आणि गुणवत्तापूर्ण अभ्यासावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
तसेच, स्पर्धा परीक्षा संदर्भात मोफत मार्गदर्शन व अभ्यासासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सम्यक अकॅडमीशी संपर्क साधावा, असे आवाहन बुद्धजय भालशंकर यांनी केले.


0 Comments