Advertisement

Breaking News
Loading...

मिरीतील केबल चोरीने शेतकरी संकटात; 16 सप्टेंबरपर्यंत नवीन केबल द्या, अन्यथा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

मोहोळ तालुक्यातील मिरी गावातील शेतकऱ्यांच्या नदीवरील शेतीपंपांच्या केबल चोरीच्या घटनेने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बुधवारी रात्री सुमारे दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी अंदाजे 600 ते 650 फूट लांबीच्या तांब्याच्या तारांच्या केबल जाळून त्यातील तांब्याची तार चोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एका शेतकऱ्याच्या केबलची किंमत सुमारे 60 हजार रुपये, तर काही केबलची किंमत 55 हजार आणि 80 हजार रुपयांपर्यंत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, पोलीस ठाण्यात केबलच्या नुकसानीची किंमत केवळ 10 ते 20 हजार रुपये धरली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. या चोरीमुळे मिरी परिसरातील शेतकऱ्यांचे एकूण 40 ते 45 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी केला आहे.

शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून काही शेतकऱ्यांना नवीन केबल खरेदी करण्यासाठी दागिने गहाण ठेवण्याची वेळ आल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन केबल उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

“16 सप्टेंबर 2026 पर्यंत मिरी गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नवीन केबल उपलब्ध करून द्याव्यात. अन्यथा 17 सप्टेंबर रोजी मोहोळ तालुक्यातील कोणत्याही मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी दिला आहे.

तसेच, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या दारात वारंवार येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी संकटाच्या काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

“माझ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाने तातडीने मदत करावी. 16 सप्टेंबरपर्यंत नवीन केबल मिळाली नाही तर 17 सप्टेंबर रोजी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू,” असे अनिल आबाजी पाटील यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणाची पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाने तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.



Post a Comment

0 Comments