सोलापूर , दि. 16 ऑक्टोबर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत गांजा विक्रीच्या संशयावरून शुभम लालासाहेब काळे (वय 28, सध्या रा. आंबेडकर नगर, अरळी कॉर्नर, जत, जि. सांगली) याला अटक केली. त्याच्याकडून 17 किलो 994 ग्रॅम गांजा, स्वीफ्ट कार आणि मोबाईल असा एकूण 15 लाख 79 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत मोहिमेअंतर्गत सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवायांवर लक्ष केंद्रित केले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मनोज राठोड यांना गोपनीय माहिती मिळाली की, कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोलापूर-मिरज महामार्गावरील इंचगाव टोलनाक्याजवळून एका स्वीफ्ट कारमधून गांजाची वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित कार अडवली.
कारची तपासणी केली असता पोत्यामध्ये उग्र वासाचा, हिरव्या रंगाचा गांजा आढळून आला. त्याचे वजन 17 किलो 994 ग्रॅम असून, त्याची किंमत 8 लाख 99 हजार 700 रुपये असल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. गांजासह कार आणि मोबाईल असा एकूण 15 लाख 79 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी कामती पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 302/2026 अन्वये अमली पदार्थ व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS Act), 1985 च्या कलम 8(क) व 20(ब)(ii)(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, गांजा कोठून आणला आणि कोठे नेला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करीत आहेत.
पोलिसांचे आवाहन : अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठवणुकीबाबत माहिती असल्यास नागरिकांनी पोलिसांना कळवावे.


0 Comments