Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- २२६ आनंदाच्या पलीकडले नाते...!!

 


रविवारचा चहा क्रमांक- २२६

आनंदाच्या पलीकडले नाते...!!

काही माणसे आयुष्यात येतात आणि जगण्याचा अर्थच थोडा सुंदर वाटू लागतो.

हे वाक्य वाचायला किती साधे वाटते, नाही का? पण या साध्या वाक्यात आयुष्याचे सगळे तत्वज्ञान दडले आहे.

आपण आयुष्यभर आनंद शोधतो. आपल्याला वाटते आनंद मोठ्या गोष्टींमध्ये आहे. मोठा पगार, मोठे घर, मोठी गाडी, मोठे यश. या मोठ्या गोष्टींसाठी आपण रात्रंदिवस धावतो. घाम गाळतो. पण या सगळ्या धावपळीत जेव्हा आपण थकून भागून एखाद्या संध्याकाळी एकटे बसतो, तेव्हा कळते .ज्या आनंदासाठी आपण धावलो, तो आनंद या मोठ्या गोष्टींमध्ये नव्हताच. तो कुठेतरी मागेच राहिला. एखाद्या छोट्याशा गोष्टीत, एखाद्या छोट्याशा माणसाच्या चार शब्दांत.

खरंच, मनाला आनंदी राहण्यासाठी फार काही लागत नाही. कधी कधी एखाद्या खास व्यक्तीचे चार प्रेमळ शब्दही पुरेसे असतात.

दिवसभराची धावपळ. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माणूस पळतो आहे. ऑफिसचे टार्गेट, घरच्या जबाबदाऱ्या, लोकांच्या अपेक्षा, स्वतःची स्वप्ने. या सगळ्यामध्ये मन इतके थकून जाते की, कधीकधी स्वतःशीच बोलायचा कंटाळा येतो.

आणि अशा वेळी एखादा फोन येतो. किंवा एखादा मेसेज. "कसा आहेस?"

फक्त दोन शब्द. पण त्या दोन शब्दात एक जादू असते. एखाद्या वैतागलेल्या, थकलेल्या मनावर कोणीतरी अलगद फुंकर घालावी, तशी ती जादू असते. दिवसभर साचलेला सगळा थकवा, सगळा शीण, कुठेतरी विरून जातो. चेहऱ्यावर नकळत हसू येते. आणि आपल्यालाही प्रश्न पडतो - अरे, मगाशी मी इतका वैतागलो होतो, आता हसतोय कसा?

कारण काही माणसांकडे एक अजब शक्ती असते. ती शक्ती म्हणजे ऐकून घेण्याची शक्ती. ते काही मोठे उपाय सांगत नाहीत. "तू असे कर, तसे कर" असा सल्ला देत नाहीत. ते फक्त ऐकून घेतात. मनापासून ऐकून घेतात.

आजच्या जगात ऐकून घेणारी माणसे दुर्मिळ झाली आहेत. सगळ्यांनाच बोलायचे आहे. आपले दुःख मोठे, आपले यश मोठे, आपले अनुभव मोठे. या सगळ्या बोलण्याच्या गोंगाटात, एखादे माणूस शांतपणे तुम्हाला ऐकून घेते, तेव्हा वाटते - आपल्यालाही कोणीतरी आहे.

तुम्ही ऑफिसमधल्या बॉसबद्दल तक्रार करता, ती व्यक्ती हसते. तुम्ही घरातल्या छोट्या कुरबुरी सांगता, ती व्यक्ती समजून घेते. तुम्ही अगदी निरर्थक विषयावर बोलता .आज पाऊस कसा पडला, आज भाजीत मीठ जास्त झाले, आज रस्त्यात कुत्रा आडवा आला. या निरर्थक गोष्टींनाही ती व्यक्ती इतक्या आपुलकीने ऐकते, की त्या निरर्थक गोष्टींनाही अर्थ प्राप्त होतो.

कधी तिचे हसणे, कधी तिची विचारपूस करणे, तर कधी अगदी साध्या विषयावर झालेल्या गप्पाही मनाला एक वेगळाच आनंद देऊन जातात. त्या काही क्षणांसाठी आपण सगळ्या चिंता विसरून जातो.हीच तर खरी श्रीमंती आहे

आपल्याला नेहमी वाटते, प्रेम म्हणजे रोज भेटणे. मैत्री म्हणजे रोज बोलणे. नाते म्हणजे सतत एकत्र असणे.

पण खरे तसे नाही.

काही नाती भेटण्यापलीकडची असतात. काही माणसे रोज भेटली नाहीत तरी चालते. महिन्यातून एकदा, वर्षातून एकदा भेटली तरी चालते. पण त्या एका भेटीतही आपलेपणा तितकाच असतो. जणू कालच भेटलो होतो.

प्रत्येक वेळी मोठमोठ्या गोष्टी बोलणेही आवश्यक नसते. तत्वज्ञान, राजकारण, भविष्याच्या योजना - हे सगळे बोललेच पाहिजे असे नाही. कधी फक्त "जेवलास का?" एवढे विचारणारी व्यक्तीही मनाला खूप जवळची वाटते.

कारण त्या "जेवलास का?" मध्ये काळजी असते. त्या "कसा आहेस?" मध्ये माया असते. त्या "काळजी घे" मध्ये आपुलकी असते.

आपण मोठ्या शब्दांच्या मागे लागतो. I Love You, I Miss You, Best Friends Forever. हे शब्द मोठे वाटतात. पण या मोठ्या शब्दांपेक्षा छोटे शब्द जास्त खरे असतात. "पोहोचल्यावर कळव", "औषध घेतलेस का?", "गाडी हळू चालव". हे शब्द प्रेमपत्रातले नसतात, पण हे शब्द आयुष्याच्या पत्रातले असतात.

काही माणसे आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येतात. त्यांना काही वेगळे करावे लागत नाही. त्यांचे फक्त असणे, आपुलकीने विचारपूस करणे आणि मनापासून ऐकून घेणेही खूप काही देऊन जाते.त्यांच्या असण्याने घर भरल्यासारखे वाटते. जसे संध्याकाळी घरात दिवा लावल्यावर घर उजळते, तसे त्यांच्या असण्याने मन उजळते.

आयुष्याच्या धावपळीत प्रत्येकाला अशी एक जागा हवी असते, जिथे मनावर कोणतेही ओझे नसते, कोणतेही बंधन नसते.

आज प्रत्येक नात्यात एक अदृश्य ओझे आहे. बॉसच्या नात्यात कामाचे ओझे आहे. नातेवाईकांच्या नात्यात अपेक्षांचे ओझे आहे. समाजाच्या नात्यात लोक काय म्हणतील याचे ओझे आहे. अगदी जवळच्या नात्यातही कधी कधी "मी कसे दिसेन" याचे ओझे असते.

पण काही माणसांजवळ हे ओझे उतरवता येते.

तिथे तुम्हाला चांगले दिसण्याची गरज नसते. तिथे तुम्ही रडलात तरी चालते. तिथे तुम्ही हट्टीपणा केलात तरी चालतो. तिथे तुम्ही काहीच न बोलता गप्प बसलात तरी चालते. कारण तिथे तुम्हाला जोखले जात नाही, तिथे तुम्हाला समजून घेतले जाते.

फक्त मनसोक्त बोलता येते आणि मनापासून हसता येते.

अशी जागा मिळणे म्हणजे आयुष्यातले सर्वात मोठे भाग्य.

आजकाल मानसोपचार तज्ज्ञांकडे लोक कशासाठी जातात? कारण त्यांना बोलायचे असते. मनातले सगळे काढून टाकायचे असते. पण त्या डॉक्टरांना पैसे द्यावे लागतात. पण ही जी चार शब्दांची माणसे असतात, ती हीच गोष्ट मोफत करतात. प्रेमाने करतात.

त्यांच्याशी बोलल्यावर थेरपी झाल्यासारखे वाटते. मन हलके होते. 

आनंद नेहमी मोठ्या गोष्टीत नसतो... कधी कधी तो फक्त एका व्यक्तीच्या चार शब्दांत लपलेला असतो!हा आनंद कसा असतो?

तो एखाद्या उन्हाळ्याच्या दुपारी मिळालेल्या थंड पाण्यासारखा असतो. फार काही नाही, पण जीव वाचवणारा असतो.

तो एखाद्या हरवलेल्या वाटेवर दिसलेल्या ओळखीच्या माणसासारखा असतो. "अरे तू इथे?" असे म्हणताच भीती निघून जाते.

तो लहानपणी आईने डोक्यावरून फिरवलेल्या हातासारखा असतो. काहीच न बोलता सगळे काही सांगून जाणारा असतो.

आपण आयुष्यभर मोठ्या आनंदाच्या शोधात असतो. पण मोठा आनंद हा छोट्या छोट्या आनंदांच्या बेरजेने बनलेला असतो. आणि हे छोटे आनंद हीच चार शब्दांची माणसे देतात.

म्हणूनच, जर तुमच्या आयुष्यात अशी माणसे असतील तर त्यांना जपा.

कारण प्रत्येकाला ऐकून घेणारे मन आणि हसवणारी व्यक्ती मिळतेच असे नाही.

आजकाल सगळेच आपले दुःख सांगायला उत्सुक आहेत, पण दुसऱ्याचे दुःख ऐकायला कुणालाच वेळ नाही. सगळ्यांनाच हसवणारा जोकर हवा आहे, पण स्वतः दुसऱ्यासाठी हसायला कुणालाच वेळ नाही. या स्वार्थी जगात, जर एखादे माणूस तुमच्यासाठी, तुमच्या काहीच उपयोग नसताना, फक्त तुम्ही तुम्ही म्हणून तुमची विचारपूस करत असेल, तर समजा तुम्ही श्रीमंत आहात.पैशाने श्रीमंत नाही, मनाने श्रीमंत आहात.

अशी माणसे तक्रार करत नाहीत. ती हक्क गाजवत नाहीत. ती फक्त असतात. पण त्यांच्या असण्याची किंमत त्यांच्या नसण्यानेच कळते.

एखाद्या दिवशी त्यांचा मेसेज आला नाही, त्यांचा फोन आला नाही, तर दिवस कसा चुकल्यासारखा वाटतो. एखादी गोष्ट घडली आणि ती सांगण्यासाठी त्यांना फोन करावा म्हटले आणि फोन लागला नाही, तर ती गोष्ट अर्धवट वाटते.तेव्हा कळते, आपण त्यांच्यावर किती अवलंबून आहोत.म्हणून त्यांना जपा. त्यांच्यासाठी वेळ काढा. त्यांनाही कधीतरी विचारा - "तू कसा आहेस?" कारण ती माणसे नेहमी तुमची विचारपूस करतात, पण त्यांची विचारपूस करायला कोणीच नसते. ती नेहमी तुम्हाला हसवतात, पण त्यांना हसवायला कोणीच नसते.

नात्याला खतपाणी लागते. चार शब्दांच्या नात्यालाही लागते.

कधीतरी त्यांनाही सांगा - "तू आहेस म्हणून बरे वाटते." कधीतरी त्यांचेही आभार माना. कारण आभार फक्त औपचारिकतेसाठी नसतात, ते प्रेम व्यक्त करण्यासाठीही असतात.

शेवटी काय आहे?

आयुष्य हे एक पुस्तक आहे. त्यात अनेक पाने आहेत. काही पाने आनंदाची, काही दुःखाची. पण काही पानांवर काही माणसांची नावे लिहिलेली असतात. ती नावे वाचली की, पुस्तक वाचण्याचा उत्साह वाढतो.

काही माणसे आयुष्यात आली की जगण्याचा अर्थच थोडा सुंदर वाटू लागतो... हे वाक्य ललित लेखाचा विषय नाही, हा जगण्याचा मंत्र आहे.

ज्यांना हा मंत्र कळला, त्यांना गर्दीतही एकटे वाटत नाही. आणि ज्यांना तो कळला नाही, ते गर्दीतही एकटेच राहतात.

म्हणूनच आज, आत्ताच, तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या त्या चार शब्दांच्या माणसाला एक मेसेज करा. फक्त एवढेच लिहा - "कसा आहेस? तुझ्याशी बोललो की बरे वाटते."

बघा, समोरच्याच्या चेहऱ्यावरही तेच हसू येईल, जे तुमच्या चेहऱ्यावर येते.

कारण आनंद वाटल्याने वाढतो. आणि चार शब्दांचे आनंदाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य हेच आहे - ते वाटता वाटता कधीच संपत नाहीत.

 प्रा.दिलीप आनंदराव जाधव

              सचिव

सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.

Post a Comment

0 Comments