Advertisement

Breaking News
Loading...

गंगेवाडीत खडी क्रशरमधून मातीमिश्रित पाणी! जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीही धोक्यात; प्रदूषण नियंत्रण विभागाच्या कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष...

 

गंगेवाडी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी गावाच्या हद्दीत असलेल्या सिद्धेश्वर कन्स्ट्रक्शन आणि संकेत स्टोन क्रेशर या कन्स्ट्रक्शन स्टोन क्रशरमधून बाहेर पडणारे मातीमिश्रित पाणी परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या स्वच्छ पाण्यात मिसळत असल्याची तक्रार शेजारील शेतकऱ्यांनी केली आहे. या पाण्यामुळे जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असून, आजूबाजूच्या शेतांमधील पिकांवरही परिणाम होत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

क्रशरमधून वाहून येणारे मातीमिश्रित पाणी शेतजमिनीत तसेच पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळत असल्याने पिके करपू लागली असून उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या नुकसानीला जबाबदार कोण? असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

नियम व अटींची अंमलबजावणी होते का?

खडी क्रशर व संबंधित खनिज उद्योगांना विविध प्रशासकीय विभागांकडून आवश्यक परवानग्या व ना-हरकत प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. या परवानग्या देताना पर्यावरण, पाणी, धूळ व प्रदूषण नियंत्रणासंदर्भात विविध अटी घातल्या जातात. मात्र, परवानगी दिल्यानंतर संबंधित उद्योगांकडून त्या अटींचे प्रत्यक्ष पालन होत आहे की नाही, याची नियमित तपासणी केली जाते का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

शेतकऱ्यांनी तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ कागदोपत्री परवानग्या न तपासता प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी करून परिस्थितीची वस्तुस्थिती तपासण्याची मागणी होत आहे.

प्रशासनाने तातडीने पंचनामा व पाण्याची तपासणी करावी

या प्रकरणात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग, कृषी विभाग, ग्रामपंचायत तसेच संबंधित खनिकर्म विभागाने संयुक्त पाहणी करावी. मातीमिश्रित पाण्याचा स्रोत, त्याचा प्रवाह, पिण्याच्या पाण्यावर होणारा परिणाम आणि शेतपिकांचे झालेले नुकसान याची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तसेच संबंधित क्रशर उद्योगांना दिलेल्या परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्रे व त्यातील पर्यावरणीय अटींचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करून दोष आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.

जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि शेतकऱ्यांच्या शेतीचा प्रश्न असल्याने प्रशासनाने या तक्रारीकडे गांभीर्याने पाहून तातडीने स्थळपाहणी व आवश्यक तपासणी करावी, अशी अपेक्षा परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



Post a Comment

0 Comments