Advertisement

Breaking News
Loading...

बार्शीत पोलिसांचा अवैध धंद्यांवर दणका! दोन स्पा सेंटरवर कारवाई; जुगार अड्ड्यांवर छापे, ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली धडक मोहीम; पीडित महिलांची सुटका, गुटखा विक्रीसह सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्यांवरही कारवाई...


बार्शी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर |

बार्शी शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध सोलापूर ग्रामीण पोलिसांनी धडक मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. अनैतिक मानवी व्यापाराच्या संशयावरून दोन स्पा सेंटरवर छापे टाकून पीडित महिलांची सुटका करण्यात आली. त्याचबरोबर तीन जुगार प्रकरणांत गुन्हे दाखल करून एकूण ४ लाख २० हजार १०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिबंधित गुटखा विक्री तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कारवाई केली.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना बार्शी शहर व तालुक्यात जुगार, स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेला कथित अनैतिक व्यवसाय आणि प्रतिबंधित गुटखा विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी स्वतः सहभागी होत विविध पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबवली.

दोन स्पा सेंटरवर छापे; पीडित महिलांची सुटका

बार्शी शहर हद्दीतील बार्शी-लातूर बायपास रोडवरील द मुनलाईट स्पा येथे पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, स्पा सेंटरचा वापर अनैतिक व्यवसायासाठी होत असल्याचे आढळून आले. या प्रकरणी दीपक गव्हाणे, पृथ्वीराज घोडके आणि केतन प्रकाश धामणेकर यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या ठिकाणी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला व्यवस्थापक म्हणून ठेवल्याचाही उल्लेख प्रसिद्धीपत्रकात आहे.

दुसरी कारवाई बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागोबाचीवाडी शिवारातील बार्शी बायपास रोडवरील डिलक्स स्पा येथे करण्यात आली. या प्रकरणी व्यवस्थापक बाबाभाई खाजाबाई चौधरी आणि मालक आकाश काशिद यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

दोन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून, इतर कोणाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या गुन्ह्यांचा तपास पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण करीत आहेत.

तीन जुगार अड्ड्यांवर कारवाई; ४.२० लाखांचा मुद्देमाल जप्त

बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन ठिकाणी जुगाराविरुद्ध कारवाई करण्यात आली.

१. सुभाषनगर-जावळे प्लॉट : एका बंद घरात कल्याण मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी प्रदीप वाघमारे, सचिन नगरे, रामचंद्र पवार, बलराम जाधव, रवि खळदगे, रविंद्र मदने, सचिन सामदळे, अमोल वायचळ, आनंद गिरी, अक्षय गिरी, दिनेश पवार आणि विनोद उमाटे हे आढळून आले. या कारवाईत रोख रक्कम, लॅपटॉप, मोबाईल, वाहने आणि जुगाराचे साहित्य असा ३ लाख १४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२. पोस्ट चौक परिसर : कल्याण मटका जुगार खेळत असल्याच्या प्रकरणात दत्तात्रय संतोष गंधे, बालाजी राजाराम सुतार, शरीफ गुलाब तांबोळी, बापू दगडू गुळवे, कर्ण सोमनाथ इंगळे आणि सतीश सुभाष नगवण यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणाहून ८४ हजार ८७३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

३. लता टॉकीज परिसर : रोन पान शॉपच्या आडोशाला मटका जुगार घेत असल्याच्या आरोपावरून सतीश तुकाराम माने (रा. लोकमान्य चाळ, जामगाव रोड, बार्शी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून २० हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

खांडवीत प्रतिबंधित गुटखा जप्त

बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांडवी येथे बार्शी-कुर्डुवाडी रस्त्यालगत बसस्थानकाजवळ असलेल्या शिवसाक्षी पानटपरीवर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी २७ हजार १०४ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन विभाग, सोलापूर यांना माहिती देण्यात आली आहे.

मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांवरही कारवाई

बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून गोंधळ घालणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये तीन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ८५(१) अन्वये, तर सात जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली संयुक्त मोहीम

ही संपूर्ण मोहीम पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यात करमाळा विभागाच्या सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस., पोलीस निरीक्षक महादेव चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक श्वेता चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक रेवणसिद्ध काळे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या मोहिमेत पोलीस अधीक्षकांचे वाचक अनिल सनगल्ले, पोलीस कर्मचारी धरेप्पा होनमोरे, प्रशांत जाधव, महिला पोलीस कर्मचारी श्रीदेवी प्रचंडे, विद्या राऊत, मसपोफौ शारदा घोळवे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सूर्यकांत जाधव, प्रवीण वाळके, लक्ष्मण राठोड, महिला पोलीस कर्मचारी प्रीती पाटील, होमगार्ड रविंद्र जाधव, पोलीस शिपाई सुनील बोंधमवाढ, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल शिंदे यांच्यासह पोलीस मुख्यालयातील दोन QRT पथके आणि एक RCP पथक सहभागी झाले होते.

अवैध व्यवसायांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून, संबंधित आरोपींविरुद्ध एमपीडीए आणि हद्दपारीसारख्या प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात येतील, असा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.



Post a Comment

0 Comments