मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ राजदत्त रासोलगीकर | अवैध वाळू उपसा करून आर्थिक फायदा मिळविणाऱ्या टोळीवर मंद्रूप पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २२ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, अनेक आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४२७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०५(ई), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन सहा चाकी टेम्पो, त्यातील अंदाजे ४ ब्रास वाळू, एक मारुती स्विफ्ट डिझायर कार, तीन मोटारसायकली आणि विविध मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे २२ लाख ५५ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रकरणात विजय सुखदेव रणखांबे (वय ६०), रोहित निलाप्पा पवार (वय २२), सागर अप्पा पवार (वय २६), अर्जुन नागनाथ नायकोडे (वय १९), गणेश आप्पासाहेब पाटील (वय २०), हणमंतु कल्लप्पा कुंभार (वय २०) आणि शिवानंद सुरेश व्हनमाने (वय २०) यांच्यासह सोमा गायकवाड याचे नाव आरोपी म्हणून समोर आले आहे. सोमा गायकवाड हा फरार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून सरकारी मालमत्ता असलेल्या वाळूचा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरीत्या उपसा करून चोरी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी पोकाँ/६६४ गणेश जगन्नाथ पाटील, नेमणूक मंद्रूप पोलीस ठाणे यांनी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही एचसी/१६७० बिराजदार यांनी केली असून, जीपीएसआय चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत.
मंद्रूप पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.


0 Comments