Advertisement

Breaking News
Loading...

पंढरपूर दुहेरी हत्याकांडाचा ७ महिन्यांनंतर उलगडा; सोलापूर ग्रामीण पोलिसांचे यश...

 


सोलापूर (दि. ११ फेब्रुवारी २०२६) : हॅलो रिपोर्टर न्यूज |पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा सुमारे सात महिन्यांनंतर उलगडा करण्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि अन्य महत्त्वाचा पुरावा जप्त करण्यात आला आहे.



दि. १५ जुलै २०२५ रोजी रात्री ९.३० वाजण्यापूर्वी सुरेखा संजय जगताप (वय ४५) व लखन संजय जगताप (वय २६), रा. शिंदे नाईक नगर, कुंभार गल्ली, पंढरपूर यांची अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने डोकीवर व अंगावर वार करून हत्या केली होती. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४६७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३ व २३८ अन्वये दि. १६ जुलै २०२५ रोजी पहाटे २.०६ वा. गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सातत्याने सुरू होता. दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत डगळे यांनी तपास स्वतःकडे घेत स्थानिक गुन्हे शाखा व एसडीपीओ कार्यालयाच्या पथकाच्या मदतीने मोबाईल डंप डेटा, सीडीआर, एसडीआर व लोकेशन विश्लेषण केले. घटनेच्या वेळी परिसरातील काही मोबाईल क्रमांक निष्क्रिय असल्याचे आढळून आल्यानंतर संबंधितांच्या हालचालींची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, खात्रीशीर माहितीच्या आधारे एका विधीसंघर्षग्रस्त बालकासह आरोपी क्रमांक १ व २ यांच्यावर संशय बळावला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जोधपूर (राजस्थान) येथे पाठवून आरोपी क्रमांक १ यास ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी क्रमांक २ यासही ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी करून गुन्ह्याची उकल केली.

तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली धारदार हत्यारे व मृतांच्या घरातील ५५ इंची दूरदर्शन संच चंद्रभागा नदीपात्रात फेकून दिल्याची माहिती दिली. त्यानुसार शोधमोहीम राबवून दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी फुटलेल्या अवस्थेतील टीव्ही संच व दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी धारदार शस्त्र जप्त करण्यात आले.

तपासात आरोपी क्रमांक २ व मृत व्यक्तींमध्ये जागेच्या वादातून तसेच अनैतिक संबंधाच्या कारणावरून हा गुन्हा घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक अब्दुलहमीद शेख, सहाय्यक पोलीस फौजदार शरद कदम, पोलीस हवालदार सुरज हेंबाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे, पोलीस अंमलदार प्रकाश कारटकर, नारायण गोलेकर, मोहन मनसावळे आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.



Post a Comment

0 Comments