Advertisement

Breaking News
Loading...

ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; शेळी-बोकड चोरी करणारा आरोपी जेरबंद, ७४ हजारांचा मुद्देमाल जप्त

 

                                  प्रतिकात्मक 

सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दि. २२ जून २०२६ : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शेळी व बोकड चोरी करणाऱ्या आरोपीस अटक करून चार गुन्ह्यांची उकल केली असून चोरीस गेलेली १० जनावरे जप्त करण्यात यश मिळवले आहे.

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील जनावरे चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके कार्यरत होती.

दि. २० जून २०२६ रोजी सहायक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग व तपास करत असताना गोपनीय माहिती मिळाली की, पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जनावर चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी राज उत्तम माने (वय २२, रा. पाटकुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) हा चोरीच्या शेळ्या विक्रीसाठी मोंडनिंब परिसरात आला आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत माळशिरस, अकलूज, टेंभुर्णी आणि पंढरपूर परिसरातून शेळ्या व बोकड चोरी केल्याची कबुली दिली.


तपासात खालील चार गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे :

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गु.र.नं. १०८/२०२६

माळशिरस पोलीस ठाणे गु.र.नं. २३/२०२६

अकलूज पोलीस ठाणे गु.र.नं. २५३/२०२६

टेंभुर्णी पोलीस ठाणे गु.र.नं. ३२/२०२६


आरोपीकडून चोरीस गेलेल्या ९ शेळ्या व १ बोकड, असा एकूण ७४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील तपासासाठी मुद्देमालासह पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक भिमगोंडा पाटील, पोलीस अधिकारी विजय शिंदे तसेच पोलीस हवालदार रवि माने, सलीम बागवान, अतुल घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज राठोड, विनायक घोरपडे, सुरज रामगुडे, अनवर अत्तार व आशुतोष जाधव यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.


Post a Comment

0 Comments