Advertisement

Breaking News
Loading...

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाकडून भावाची तलवारीने निर्घृण हत्या; कामती खुर्द परिसर हादरला...

 


कामती खुर्द | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर जिल्ह्यातील कामती खुर्द परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतजमिनीच्या जुन्या वादातून एका शेतकऱ्याची त्याच्याच सख्ख्या भावांनी व पुतण्यांनी मिळून तलवारीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय नागनाथ शिंदे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. संजय शिंदे आणि त्यांच्या भावांमध्ये शेतजमिनीच्या कारणावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे दुचाकीवरून शेताकडे गेले असता, आधीपासून टपून बसलेल्या त्यांच्या सख्ख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांना गाठले.

यावेळी पुन्हा वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर थेट हल्ल्यात झाले. आरोपींनी सोबत आणलेल्या धारदार तलवारीने संजय शिंदे यांच्यावर सपासप वार केले. शरीराच्या विविध भागांवर गंभीर जखमा झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

दरम्यान, मृताच्या मुलाने आपल्या वडिलांची हत्या ही पूर्वनियोजित कट रचून करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला आहे. शेतजमिनीच्या वादातूनच सख्ख्या भावांनी आणि पुतण्यांनी हा हल्ला केल्याचा दावा त्याने केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे पाठविण्यात आला आहे.

संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी व तीन मुले असा परिवार आहे. सख्ख्या भावांमधील वादातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे कामती खुर्द आणि परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.


Post a Comment

0 Comments