वळसंग | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर :
सोलापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवार (दि. ४ फेब्रुवारी २०२६) रोजी सायंकाळी 5 वाजता वळसंग येथे भव्य जाहीर सभा उत्साहात पार पडली. या सभेला परिसरातील प्रत्येक तालुक्यातून महिला भगिनी व शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली होती.
सभेला संबोधित करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आणि शब्दांचा पक्का आहे.” आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजनेसह अनेक लोकहिताच्या योजना सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. महिलांची मोठी उपस्थिती पाहून ते म्हणाले, “जिकडे महिलांची संख्या जास्त, तिकडे विजय निश्चित!” यावेळी महिलांच्या टाळ्यांच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला.
दरम्यान, विरोधकांवर टोला लगावताना शिंदे म्हणाले, “छोट्या छोट्या केसेस करणाऱ्यांना आपण नंतर पाहू,” असे ठणकावून सांगत त्यांनी शिवसैनिकांचा आत्मविश्वास वाढवला. सोलापूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या, निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाही,” अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
सभेदरम्यान संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. घोषणाबाजी, शिवसेनेचे झेंडे आणि महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे ही सभा निवडणूक प्रचारातील लक्षवेधी ठरली.





0 Comments