बार्शी | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी :
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने सराईत गुन्हेगारांविरोधात कडक पावले उचलत बार्शी येथील कुख्यात गुन्हेगार मोहसिन साबीर तांबोळी व त्याच्या टोळीतील सदस्यांना १ वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल वि. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये केली आहे.
पोलीस निरीक्षक, बार्शी शहर पोलीस ठाणे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार मोहसिन तांबोळी टोळीवर खंडणी मागणे, घातक शस्त्रांचा वापर करून मारहाण, महिलांची छेडछाड, जातीवाचक शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते. टोळी संघटीतपणे तसेच स्वतंत्ररित्या गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
या टोळीत मोहसिन साबीर तांबोळी (टोळी प्रमुख), शहाबाज जहाँगीर शेख, इब्राहिम राजअहमद शेख आणि अखिल इब्राहिम सय्यद (सर्व रा. बार्शी, ता. बार्शी, जि. सोलापूर) यांचा समावेश आहे. यापूर्वीही टोळीतील सदस्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती; मात्र सुधारणा न झाल्याने अखेर हद्दपारीची कठोर कारवाई करण्यात आली.
प्रकरणाची सुनावणी पोलीस अधीक्षक तथा हद्दपार प्राधिकरण मा. श्री. अतुल कुलकर्णी यांच्यासमोर होऊन टोळीला सोलापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.
यावेळी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, हद्दपार करण्यात आलेले इसम प्रतिबंधित क्षेत्रात आढळून आल्यास तत्काळ संबंधित पोलीस ठाणे किंवा सोलापूर ग्रामीण नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच भविष्यात दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या इसमांविरुद्धही प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी मा. श्री. अशोक सायकर (बार्शी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप (स्थानिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे (बार्शी शहर पोलीस ठाणे) तसेच इतर अधिकारी व पोलीस अंमलदारांच्या सहकार्याने पार पडली आहे.


0 Comments