Advertisement

Breaking News
Loading...

कुंभारीत ‘नोटांचा खेळ’ उघड? मतदार खरेदीप्रकरणी माकपची तक्रार; राजकीय वर्तुळात खळबळ...

 


कुंभारी | हॅलो रिपोर्टर न्यूज | निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ. राजदत्त रासोलगीकर:

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर कुंभारी परिसरात मतदारांना पैसे व विविध प्रलोभने वाटप केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) — माकप — यांनी निवडणूक आचारसंहिता कक्षाकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या आरोपांमुळे स्थानिक राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे.



माकपचे जिल्हा समिती सदस्य व निवडणूक प्रमुख कॉ. बापू राजाराम साबळे यांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार, कुंभारी गण क्रमांक 115 आणि जिल्हा परिषद गट क्रमांक 58 अंतर्गत गोदूताई परुळेकर नगर परिसरात काही व्यक्तींनी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैसे व इतर प्रलोभने देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या तक्रारीत भाजपचे उमेदवार सुरज पाटील तसेच त्यांचे कार्यकर्ते सोम करपे यांची नावे नमूद करण्यात आली आहेत.



सदर प्रकार कुंभारी येथील 4 नंबर वॉर्डात, श्री. माळी यांच्या निवासस्थानी रात्री सुमारे 8.08 वाजता घडल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. माकपचे कार्यकर्ते आप्पाशा चांगले यांनी संबंधित व्यक्तींना रंगेहाथ पकडल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे आदर्श आचारसंहिता तसेच लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील कलम 123 (1) व 123 (2) यांचा भंग झाल्याचा आरोप करण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 170 व 171 चेही उल्लंघन झाल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय निवडणूक प्रक्रियेवर अशा प्रकारांचा गंभीर परिणाम होतो, असे नमूद करत या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी माकपकडून करण्यात आली आहे. तसेच निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

या तक्रार प्रक्रियेसाठी आप्पाशा चांगले, ॲड. अनिल वासम व ॲड. शाम आडम यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती माकपकडून देण्यात आली.

Post a Comment

0 Comments