मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्युज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे:
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मंद्रूप पोलीस ठाण्याने अवैध धंद्यांविरोधात सुरू केलेल्या विशेष मोहिमेला अधिक वेग आला असून, पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी आणि निर्णायक कारवाई करत अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश केला आहे.
मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 24/2026 अन्वये महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल माजिद अहमद शेख (ब. नं. 635) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली.
दि. 31 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास मौजे तेरामैल ते संजवाड रोड, ता. दक्षिण सोलापूर येथे पोलिसांनी सापळा रचून वाहन तपासणी केली असता आरोपी मल्लीकार्जुन सिध्दाप्पा वाघमारे (वय 47, रा. कोर्सेगाव, ता. अक्कलकोट) हा देशी व विदेशी दारू विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या वाहतूक करताना आढळून आला.
या कारवाईत विविध ब्रँडच्या देशी व विदेशी दारूच्या शेकडो सीलबंद बाटल्या तसेच सुमारे 7 लाख रुपये किंमतीची टाटा सुमो (क्र. MH-13 AZ 8115) असा एकूण 7,44,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आदलिंग हे करीत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार, पो. उपनिरीक्षक राज डांगे तसेच पोलीस हवालदार आदलिंग, पोलीस कॉन्स्टेबल माजिद शेख, लखन पवार व चेतन गवंडी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू, गुन्हेगारी व बेकायदेशीर कृत्यांविरोधात मंद्रूप पोलिसांची ही धडक कारवाई पुढेही सुरूच राहणार असून, “गुन्हेगारांना कुठेही थारा दिला जाणार नाही,” असा कडक इशारा मंद्रूप पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांनी कोणतीही संशयास्पद माहिती तात्काळ पोलिसांना कळवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments