Advertisement

Breaking News
Loading...

गंगेवाडीतील वडार समाज मंदिर बांधकामात निकृष्टतेचा आरोप; ८.४५ लाखांचा खर्च वादात...

 


गंगेवाडी | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : महाराष्ट्र शासनाच्या २५१५ ग्रामविकास सुधारणा कार्यक्रम सन २०२४-२५ अंतर्गत मौजे गंगेवाडी येथे वडार समाज मंदिर बांधकामासाठी मंजूर करण्यात आलेल्या ₹ ८,४५,९२७ रुपयांच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांकडून या कामाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

सदर काम मा. आ. श्री. सचिन कल्याणशेट्टी यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाले असून, कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (सा. बा.), सोलापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कामाचा प्रारंभ दिनांक १४ मार्च २०२४ रोजी झाला असून, ठेकेदार म्हणून चेअरमन रामदास मजूर सहकारी संस्था मर्या., सोलापूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र प्रत्यक्षात उभारण्यात आलेल्या समाज मंदिराच्या बांधकामात अनेक त्रुटी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मंदिराच्या फरशा असमतोल बसविण्यात आल्यामुळे सांडलेले पाणी वाहून न जाता जागेवरच साचत असल्याचे दिसून येते. तसेच उभारण्यात आलेल्या पिलर्सना करण्यात आलेला गिरावा वेळेवर पाणी न मारल्यामुळे सिमेंट व वाळू निघून पडत असल्याची स्थिती आहे.

याशिवाय छताचे कामही निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप असून, संपूर्ण बांधकामात दर्जाहीन साहित्याचा वापर झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. संबंधित कामाकडे लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांचे दुर्लक्ष झाल्याचेही बोलले जात आहे.

ग्रामस्थांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच कामाचा दर्जा तपासून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. शासनाच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या विकासकामांमध्ये पारदर्शकता व गुणवत्तेची हमी देणे आवश्यक असल्याचे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे.



Post a Comment

0 Comments