Advertisement

Breaking News
Loading...

१५ मोटारसायकलींसह आंतरजिल्हा सराईत चोर जेरबंद; सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कारवाई... ₹ ४.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; सहा जिल्ह्यांतील गुन्ह्यांची उकल...

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | सोलापूर शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांना आळा घालत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत चोरास अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे ₹४,४५,००० इतकी आहे.



सीसीटीव्ही विश्लेषणातून आरोपीचा माग काढला:

शहरात वारंवार मोटारसायकल चोरीच्या घटना घडत असल्याने सोलापूर शहर गुन्हे शाखा यांना तपासाचे आदेश देण्यात आले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने विविध घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले.



सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. १६४/२०२६ (बी.एन.एस. कलम ३०३(२)) संदर्भात तपास करताना संशयिताची ओळख पटविण्यात आली.

विष्णू घाट परिसरातून आरोपी ताब्यात:

२८ फेब्रुवारी रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सोलापूर शहरातील विष्णू घाट परिसरात सापळा रचून नंबर प्लेट नसलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल विक्रीसाठी उभा असलेला इसम ताब्यात घेतला. चौकशीत त्याने आपले नाव सचिन अंकुश कात्रे (वय ४०), मुळ रा. मसोबाची वाडी, ता. वाशी, जि. धाराशिव (सध्या रा. अंबिका चौक, बीड) असे सांगितले.

सखोल चौकशीत आरोपीने सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत त्याने मागील सहा महिन्यांत अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातून आणखी १४ मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले.

सहा जिल्ह्यांतील गुन्ह्यांची उकल:

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली या खालील पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या असल्याचे समोर आले आहे:

सदर बझार, विजापूर, कोतवाली (अहिल्यानगर)

शेवगाव, जामखेड

बीड ग्रामीण, गेवराई

कळंब (धाराशिव), औसा (लातूर), कदिम (जालना)

एकूण १५ मोटारसायकली पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आल्या आहेत.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई...

ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरीत्या ही यशस्वी कामगिरी बजावली.

विशेष: आरोपीकडील एका मोटारसायकलीबाबत अभिलेख तपासणी सुरू असून पुढील तपास सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे.

सोलापूर शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.



Post a Comment

0 Comments