सोलापूर ग्रामीण | हॅलो रिपोर्टर न्यूज : मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :
होळी व धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूनिर्मिती व विक्री रोखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई करत ७ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत तब्बल ३,८७,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ११ आरोपींविरुद्ध दारूबंदी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मा. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी विशेष पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले होते.
छापेमारीची ठिकाणे:
मौजे मुळेगाव तांडा (ता. दक्षिण सोलापूर)
मौजे गुळवंची (ता. उत्तर सोलापूर)
कामती पोलीस ठाणे हद्द
मौजे जवळा (ता. सांगोला)
जप्त मुद्देमाल:
७,८०० लिटर गुळमिश्रीत रसायन (हातभट्टी दारूनिर्मितीसाठी)
५८ लिटर हातभट्टी दारू
२५ लिटर शिंदी
१४१ देशी दारूच्या बाटल्या
मुळेगाव तांडा व गुळवंची येथे हातभट्टी दारू तयार करण्याच्या दोन ठिकाणी छापे टाकून ३९ बॅरेलमधील गुळमिश्रीत रसायन जागीच नष्ट करण्यात आले. तसेच कामती व जवळा परिसरातही स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.
ही संपूर्ण कारवाई मा. अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि भाऊसाहेब गोसावी, पोलीस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के व श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीरीत्या बजावली.
सणासुदीच्या काळात अवैध दारूधंद्यांवर पोलीसांचा करडा पहारा कायम राहणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.




0 Comments