Advertisement

Breaking News
Loading...

धुळवडीला मंद्रूपच्या युवकांची अनोखी परंपरा; हिंदू स्मशानभूमी स्वच्छतेतून विधायक संदेश...

 


मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज |प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे :

सोलापूर शहरालगतच्या मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथील युवकांनी धुळवड निमित्ताने हिंदू स्मशानभूमीची स्वच्छता करून समाजासमोर विधायक कृतीशीलतेचा आदर्श ठेवला. मागील पाच वर्षांपासून ‘आम्ही मंद्रूपकर’ उपक्रमांतर्गत रानवेध फाउंडेशनच्या पुढाकाराने धुळवडीच्या दिवशी स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविण्याची परंपरा सुरू आहे.

मंगळवारी (दि. ३) सकाळी ६.३० वाजता युवकांनी हातात खराटे घेऊन स्वच्छता मोहिमेस सुरुवात केली. दहनशेडमधील राख झाडांच्या मुळाशी टाकून परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. काटेरी झाडी-झुडपांनी वेढलेल्या बसस्थानक परिसरातील हिंदू स्मशानभूमी काही तासांत स्वच्छ करण्यात युवकांना यश आले. झाडून गोळा करण्यात आलेला सुमारे दहा गाड्या कचरा-पालापाचोळा खत निर्मिती प्रकल्पाकडे पाठविण्यात आला.

मुकेश खराडे यांनी स्वच्छता मोहिमेसाठी शेत-शिवारातून तुरीच्या काड्या गोळा करून स्वतः खराटे तयार केले. विकास शिळ्ळे, जगन्नाथ खरात यांनी दहनशेडमधील राख झाडांभोवती टाकली. सिद्धेश्वर नंदुरे व सचिन साठे यांनी दहनशेडची स्वच्छता केली. रवी केवटे यांनी अंत्यसंस्कारासाठी वापरलेले बांबू झाडांना आधार म्हणून वापरले. श्याम गोसावी, अक्षय झेंडेकर, नितीन खराडे यांनी कचरा व अनावश्यक वस्तू जाळून परिसर स्वच्छ केला.

या मोहिमेत अवघ्या आठ वर्षांचा रितुल गोसावी व ११ वर्षांची तनुजा केवटे या चिमुकल्यांनीही खराटा हातात घेऊन स्वच्छतेत सहभाग घेतला. मागील पाच वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाची प्रेरणा इतर गावांतील युवक मंडळांनी घेतली असून अनेक ठिकाणी अशाच प्रकारे स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवले जात आहे.

ग्रामपंचायतीचेही सहकार्य:

गावातील युवकांनी स्वच्छता मोहिम सुरू केल्याचे समजताच माजी सभापती अप्पाराव कोरे व ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मदतीसाठी पाठविले. महिला सफाई कामगारांसह लिपीक अमोल बाळगी, सतीश म्हेत्रे व वाहन चालक चाँद शेख यांनीही या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.


यांचा पुढाकार:

नितीन खराडे, मुकेश खराडे, सचिन साठे, रवी केवटे, जगन्नाथ खरात, विनोद कामतकर, रितुल गोसावी, तनुजा केवटे, ओंकार झेंडेकर आदी युवकांनी या उपक्रमात पुढाकार घेतला.


कोट:

“गावातील युवकांनी एकजुटीने धुळवडीला स्मशानभूमीची स्वच्छता केली. ही विधायक उपक्रमाची सुरुवात असून भविष्यात आणखी लोकसहभागातून असे उपक्रम राबविण्यात येतील.”

— जगन्नाथ खरात

“धुळवड निमित्ताने स्मशानभूमी स्वच्छ करण्याची संकल्पना रानवेध फाउंडेशनने मांडली. ‘आम्ही मंद्रूपकर’ म्हणून त्याला प्रतिसाद दिला. एकजुटीतून स्मशानभूमी स्वच्छ झाली असून संपूर्ण गावही स्वच्छ होऊ शकते, हा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.”

— श्याम गोसावी, युवक, मंद्रूप



Post a Comment

0 Comments