Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- २०० पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी...!!

 


रविवारचा चहा क्रमांक- २००

 

पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी...!!


तुकोबाराय कधी तीर्थयात्रेला गेले होते वा नाही ते माहिती नाही. पण या अभंगात ते असं म्हणतात की काशी म्हणजे वाराणसी, गया आणि द्वारका पाहिली पण पंढरीची सर कोणालाच नाही. पंढरपूरला कोणी नवस करत नाहीत, व्रत असलं तर फक्त नियमित वारी आणि एकादशीचं ! तिथे कोणी छोटा, कोणी मोठा नाही. कोणी उच्च, कोणी नीच नाही. कोणी श्रेष्ठ ,कोणी कनिष्ठ नाही. कोणी स्पृश्य , कोणी अस्पृश्य नाही. कोणी कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, स्त्री असो वा पुरुष असो सर्व समान आहेत. सर्वच देव आहेत. प्रत्येक जण एकदुसऱ्यातल्या देवाला नमस्कार करतो. तसा करताना त्याची जात, त्याचा धर्म, त्याचं लिंग, त्याचं समाजातलं स्थान, त्याची गरीबी वा श्रीमंती वगैरे कसलाही विचार करत नाही. चराचरात ब्रह्म आहे यावर प्रत्येक वारकऱ्याचा ठाम विश्वास आहे. 

तुकोबाराय म्हणतात,"खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे ।। क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका पायी लागती रे ।।, वर्णअभिमान विसरली ज्ञाती । एक एका लोटांगणी जाती रे ।।" तसेच *वाराणसी गया पाहिली द्वारका । परी न ये तुका पंढरीच्या ।।* तुकोबाराय अनेक अभंगातून या समतेच्या विचारांची पाठराखण आणि पुरस्कार करतात. "विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेद भ्रम अमंगळ ।।"; "अवघी एकाचि च वीण । तेथे कैंचे भिन्नाभिन्न ।।"; "यातायाती धर्म नाही विष्णुदासा । अशा अनेक अभंगातून तुकोबाराय मानवी एकतेचा आणि समतेचा पुरस्कार करतात. अशा प्रकारची समता फक्त पंढरीच्या भूमीतच अनुभवायला मिळते. दुसऱ्या कोणत्याही तीर्थक्षेत्री अशी समता अनुभवायला मिळत नाही. इतर क्षेत्री देवाला प्रसन्न करुन घेण्यासाठी नानातऱ्हेचे प्रयास करावे लागतात.

व्रतवैकल्यांचे सायास करावे लागतात. तरीही देव भेटतही नाही आणि प्रसन्नही होत नाही. फार फार तर भरपूर दानदक्षिणा मिळाल्याने भूदेव म्हणवणारे तेवढे प्रसन्न होतात. पण पंढरपूरचा विठोबा मात्र भक्तवेल्हाळ आहे. तो फक्त भावाचा भुकेला आहे. त्याला पूजा ,अर्चा, अभिषेक,अनुष्ठान , यज्ञ वा याग नको, फक्त निर्मळ भक्तीभाव हवा. भक्ताने हाक मारण्याच्या आधीच तो धावून येतो. जनाईला तो दळू लागतो. सजन कसायाला मांस तुळू लागतो. सावता महाराजांना निंदू-खुरपू लागतो.

कबीराला शेले विणू लागतो. तो चोखोबांचा दहीभात खातो, नामदेवांच्या हातून प्रसाद खातो. हा विठ्ठल माय आहे, बाप आहे. भाऊ आहे, बहिण आहे. काका आहे, मित्र आहे, सखासोयरा आहे. संतशिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, "तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल ।देव विठ्ठल देवपूजा विठ्ठल ।। माता विठ्ठल पिता विठ्ठल ।बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल ।। संत एकनाथ महाराज म्हणतात, "बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई ।। सर्वच संतांनी विविध नात्यात विठ्ठल पाहिला आहे. विठ्ठलाची कोणाला भीती वाटत नाही. हा एकमेव देव असावा ज्याच्या हातात कोणतंही शस्त्र नाही. विठ्ठल कधी उग्र रुप धारण करत नाही. तो सदा मायाळू आहे. दयाळू आहे. जिथे विठ्ठल आहे तिथे दु:खाला थारा नाही. विठ्ठल आहे तिथे भेद नाही. विठ्ठल आहे तिथे फसवणूक नाही. विठ्ठल आहे तिथे शोषण नाही. सक्ती नाही. विठ्ठल असेल तिथे यमाला थारा नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात जो एकवेळा पंढरपूरला जाईल त्याच्या घरी यम जाणार नाही. कारण जो पंढरपूरला जाईल तो विठ्ठलमय होऊन जाईल. कारण देव आणि भक्त यात भेद नाही.

भक्तच देव झाला म्हणजे तो अमर झाला. आता त्याला जरा नाही. मरण नाही. पुनर्जन्म नाही. चौऱ्यांशीचा फेरा नाही.ज्यावर हरिठसा उमटलेला असतो, तो हा भवसागर तरुन जातो आणि जगी वंद्य होतो. अंगी हरिठसा असणं म्हणजे चराचराकडे समत्वाने पाहण्याची द्रूष्टी असणं. सर्व एकाच परब्रह्माची रुपं आहेत हे जाणणं. बाह्यरुप कोणतंही असलं तरी त्यावरुन भेद न करणं. वारकरी वारीला जातात तेंव्हा समोर आल्यावर एकमेकांच्या पाया पडतात. म्हणजे प्रत्येक जण दुसऱ्यातलं जे ब्रह्म आहे त्याला वंदन करतो. तसं करताना ते आपली जात, धर्म, लिंग सर्व विसरतात. ही अतिशय क्रांतीकारक गोष्ट आहे. वारकरी धर्म माणसाकडे माणूस म्हणून पहायला शिकवतो. संतांनी दिलेली शिकवण आयुष्यभरासाठी आणि जगण्यासाठी असते. वारीत समता गावात विषमताआणि तसेच वारीत समता घरात विषमता हे ढोंग आहे.वारकरी हा सत्यशोधक असतो. तो सत्याचाच पाठिराखा असतो. त्याच्या मनात श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना नसते. त्याचं मन आणि आचरण शुद्ध असतं. परजातीबद्दल, परधर्माबद्दल त्याच्या मनात द्वेषभावना नसते. कारण "अवघी एकाचि च वीण"; यावर त्याचा पूर्ण विश्वास असतो. खरा वारकरी कष्ट करुन स्वतःचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.तो देवाधर्माच्या नावावर लांड्यालबाड्या करुन, भ्रष्टाचार करुन पैसा कमवत नाही.

 पांडुरंगाच्या नुसत्या नामस्मरणीसुद्धा भक्ती आणि धर्मकार्य करता येत हा हरिदासांचा , आपल्या संतांचा उपदेश काहींना मान्य नव्हता, कारण त्यांची रोजगार हमी बंद पडत होती, म्हणून असे काही लोक काय म्हणत होते यावर तुकोबाराय मांडतात,

हरिदासाच्या पडती पाया l म्हणती, तया नागवावे ll

ज्या हरीच्या दासाच्या पाया पडतात सामान्य लोक, त्या सामान्य वारकऱ्यांची फजिती करा त्यांच्यावर बहिष्कार घाला. अशा गोष्टीला तुकोबारायांला घाबरवून देखील घाबरत नव्हते, म्हणून त्यावेळी सनातन्यांनी तुकोबारायाच्या पाया पडणाऱ्यांना उघड धमकी दिल्याचं तुकोबाराय हे अभंगात निर्भीडपणे मांडतात.

 प्रा. दिलीप आनंदराव जाधव, सांगली

 सचिव

 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.

 राज्य कोषाध्यक्ष

 कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत..!


Post a Comment

0 Comments