गंगेवाडी (ता. दक्षिण सोलापूर) | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | शेगावच्या राजा श्री गजानन महाराजांची पवित्र पालखी सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करताच जिल्ह्याच्या सीमेवरील पहिले गाव असलेल्या गंगेवाडी येथे वारकरी संप्रदाय, ग्रामस्थ आणि भाविकांनी उत्स्फूर्त व भव्य स्वागत केले. महिलांनी फुगड्या खेळत आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पालखीचे स्वागत केल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.
यावेळी प्रतिष्ठित नागरिक पंकज गुळवे, धनराज जाधव, सज्जन गुंड, महादेव जाधव, मारुती जाधव, रविकांत रवळे, मुरुगू देवकर, सुनील नरवडे, समाधान जाधव, हरिभक्त परायण एकनाथ कदम, अण्णा गुळवे यांच्यासह गंगेवाडीतील सर्व वारकरी संप्रदाय, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने या स्वागत सोहळ्याला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.
पालखीच्या आगमनानंतर भाविकांसाठी सुमारे १५० लिटर दूध, केळी व पाण्याचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. वारकरी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड तसेच उपस्थित भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.
या प्रसंगी आरटीआय कार्यकर्ते शीलवंत चौगुले हेही उपस्थित होते. गंगेवाडी ग्रामस्थांच्या भक्तिभावाने आणि उत्स्फूर्त सहभागामुळे श्री गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यातील आगमन अत्यंत थाटामाटात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले.


0 Comments