Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- २१६ आयुष्याची वारी: न परतणारी...!!

 


रविवारचा चहा क्रमांक- २१६

आयुष्याची वारी: न परतणारी...!!


वारी म्हटली की डोळ्यासमोर येते ती धुळीची वाट. टाळ, मृदुंग, पताका, अभंग. पायात चटके, तोंडात विठ्ठलाचं नाव. लाखो माणसं एका वेड्यासारखी पंढरीकडे चालली आहेत. कुणाच्या डोईवर तुळशीचा माठ, कुणाच्या खांद्यावर दिंडीचा झेंडा. 

पण एक वारी अशी आहे जिचा झेंडा दिसत नाही, दिंडी लागत नाही, आणि तरीही ती कधीच थांबत नाही. तिचं नाव आहे "आयुष्याची वारी". 

जन्माला येऊन दुडुदुडु चालायला लागलं की ही वारी आपोआप सुरू होते. आणि एकदा सुरू झाली की शेवटच्या श्वासापर्यंत थांबत नाही.

पंढरीची वारी आषाढात सुरू होते. तारीख ठरलेली असते. 

आयुष्याची वारी मात्र बाळाच्या पहिल्या रडण्याबरोबरच सुरू होते. मुलगी जन्माला आली की तिच्या नशिबाची गाठ आधीच बांधून ठेवलेली असते. 

"मुलगी आहे, जपून वाढवायची. उद्या सासरी जायचंय." 

हा पहिला भार डोईवर ठेवला जातो. तो तिला दिसतही नाही. पण तो असतो.

शाळेत गेली की दप्तरासोबत "नीट वाग, चारचौघी काय म्हणतील" हा दुसरा भार. 

मोठी झाली की "लग्नाचं वय झालं" हा तिसरा. 

लग्न झालं की "सासर सांभाळ, घर सांभाळ" हा चौथा. 

मूल झालं की "आता तू फक्त आई आहेस" हा सगळ्यात जड भार.

पंढरीच्या वारीला वाटेत थांबायला मुक्काम असतात. आयुष्याच्या वारीला मुक्काम कुठे? रात्री दोन वाजता बाळ रडलं तरी वारी सुरूच. नवरा आजारी पडला तरी वारी सुरूच. सासूने शब्द बोलले तरी वारी सुरूच.

पंढरीच्या वारीत बाईच्या डोईवर तुळशीचा माठ असतो. त्यात पवित्र पाणी असतं. तो भार जड असतो, पण पवित्र असतो. वाटेत माणसं "माऊली, सांभाळून" म्हणतात. वाटेत सावली मिळते. दिंडीतली बहीण हात देते.

आयुष्याच्या वारीत मात्र बाईच्या डोईवर काय असतं? 

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. कोणाला काय आवडतं, कोणाच्या औषधाची वेळ, मुलांच्या फीची तारीख, घरचं बजेट, पाहुणे येणार आहेत. ही यादी कधीच संपत नाही. नवऱ्याचा राग सांभाळायचा, सासूचं मन राखायचं, मुलांचे लाड करायचे, माहेरच्यांची काळजी करायची. प्रत्येकाचं मन सांभाळताना स्वतःचं मन कुठेतरी हरवून जातं"असं वागू नकोस, तसं बोलू नकोस, हा ड्रेस नको, ही नोकरी नको, उशिरा येऊ नको." चारचौघींचा आरसा सतत तिच्यासमोर धरलेला असतो.

तुळशीच्या माठातलं पाणी सांडलं तर पुन्हा भरता येतं. पण आयुष्याच्या वारीत मनातलं पाणी एकदा सांडलं की ते परत भरत नाही. तरीही ती चालत राहते.

पंढरीच्या वारीत वाट एकच असते. देहू, आळंदी मार्गे पंढरपूर. वाटेत वारकरी एकमेकांना "राम कृष्ण हरी" म्हणतात. कुणी भूक लागल्यावर पोळी देते, कुणी पाणी देते. 

आयुष्याच्या वारीत मात्र वाटा वेगवेगळ्या. कुणाची वाट शेतात जाते, कुणाची ऑफिसमध्ये, कुणाची कारखान्यात, कुणाची चार भिंतींच्या आत. 

ऑफिसमध्ये जाणारी बाई दोन वारी एकत्र करते. सकाळी घराची वारी आटपून ऑफिसची वारी. बॉसचा टोमणा ऐकून घरी येऊन मुलाचा अभ्यास. तिथेही "बाई आहेस, जास्त बोलू नकोस" हा भार.

घरात राहणाऱ्या बाईची वारी तर दिसतच नाही. "तू काय करतेस दिवसभर?" हा प्रश्न तिच्या वारीचा अपमान करतो. भांडी, कपडे, स्वयंपाक, नाती सांभाळणे... हे काम दिसत नाही म्हणून त्याला किंमत नसते का?

शेतात काम करणाऱ्या बाईच्या डोईवर तर तिहेरी भार. शेताचा, घराचा आणि कर्जाचा. तरी पहाटे चारला उठून ती चूल पेटवते.

प्रत्येक वाट वेगळी, पण डोईवरचा भार मात्र सारखाच.

पंढरीच्या वारीत तान्ह्या मुलापासून म्हाताऱ्या आजीपर्यंत सगळे अभंग म्हणतात. "विठ्ठल विठ्ठल" म्हणताना पायातले फोडही जाणवत नाहीत. दुःखाला शब्द मिळतात, त्यामुळे ते हलकं होतं.

आयुष्याच्या वारीत अभंग कोण म्हणणार? 

तिला मिळतात टोमणे. "नोकरी करून घराकडे लक्ष देत नाहीस". "घरीच असतेस तरी नीट स्वयंपाक होत नाही". "मुलं बिघडली कारण तू लक्ष देत नाहीस". 

तिच्या थकव्याला शब्द नाहीत. तिच्या त्यागाला माप नाही. तिच्या रडण्याला वेळ नाही. 

म्हणून ती गप्प राहून चालत राहते. गप्प राहणे हाच तिचा अभंग बनतो.

कोणताही भार सतत डोईवर ठेवला तर मान वाकते. तिची मानही वाकते. आरशात बघितल्यावर तिला स्वतःच्या डोळ्यांखालचे काळे पट्टे दिसतात. केसात पांढरा तारा दिसतो. 

कधी कधी तिला वाटतं "बस, आता नाही चालवत". 

पण दुसऱ्याच क्षणी आठवतं, "मी थांबले तर घराचं काय होईल? मुलांचं काय होईल?" 

म्हणून ती परत उठते. पदर खोचते आणि चालू लागते. 

हेच तर तिचं वीर्य आहे. कोणतंही पदक न मिळता, कोणतीही शाबासकी न मिळता, दररोज पुन्हा नव्याने सुरुवात करणे.

पंढरीच्या वारीला शेवटी विठ्ठलाचं दर्शन होतं. गर्दीतून मार्ग काढून, लोटांगण घालून माऊलीचा चेहरा दिसतो आणि सगळा थकवा निघून जातो.

आयुष्याच्या वारीला असं दर्शन होतं का? 

कधी मुलगा मोठा होऊन "आई, तू नसतीस तर..." म्हणतो तेव्हा होतं. 

कधी नवरा आजारी असताना तिच्यामुळेच घर सावरलं हे कबूल करतो तेव्हा होतं. 

कधी मुलगी तिच्यासारखीच न होता, तिच्यापेक्षा मोकळी होऊन जगते तेव्हा होतं.

हे छोटे छोटे दर्शन तिला पुढच्या हजार पावलांसाठी बळ देतात.

प्रश्न हा आहे की हा भार कधी हलका होणार? 

उत्तर सोपं नाही. कारण हा भार एका दिवसात आलेला नाही. शेकडो वर्षांच्या विचारांनी तो डोईवर ठेवला गेला आहे. "बाई म्हणजे देणारी" ही शिकवण इतकी पक्की झाली आहे की घेण्याचा विचारही तिला पाप वाटतो.

पण बदल सुरू झाला आहे. 

आजची मुलगी "नाही" म्हणायला शिकतेय. 

आजचा नवरा स्वयंपाकात हात लावतोय. 

आजचा समाज हळूहळू का होईना, पण मान्य करतोय की घर हे फक्त बाईचं एकटिचं काम नाही.

पंढरीच्या वारीत जसे आता ट्रॅक्टर, गाड्या आल्या आहेत, तरी चालण्याचं महत्व कमी झालं नाही. तसंच आयुष्याच्या वारीतही मदत आली तरी चालण्याची ताकद बाईमध्येच आहे.

आयुष्याची वारी कुणाला चुकली आहे का? 

नाही. जन्माला आलेला प्रत्येक जण ही वारी करतोय. फरक एवढाच की पुरुषाच्या डोईवरचा भार आणि बाईच्या डोईवरचा भार यांची तुलना होऊ शकत नाही.

पुरुषाचा भार बहुतेक बाहेरचा असतो. कमाईचा, जबाबदारीचा. 

बाईचा भार आत आणि बाहेर दोन्ही असतो. घराचा आणि मनाचा.

म्हणूनच म्हणावंसं वाटतं, 

पंढरीच्या वारीला बाईच्या डोईवर तुळशीचा भार असतो. 

पन आयुष्याच्या वारीत तरी दुसरं काय? 

बाईच्याच डोईवर असतो समदा भार.

तरीही ती तक्रार करत नाही. कारण तिला माहीत आहे, ही वारी तिच्यामुळे चालली आहे. 

जर एक दिवस तिने डोईवरचा माठ खाली ठेवला, तर अनेकांची तहान भागणार नाही. 

म्हणून ती चालते. 

पाय दुखत असले तरी चालते. 

डोळे भरून आले तरी चालते. 

कारण तिचं नावच "माऊली" आहे. माऊली थांबली तर वारीच थांबेल.

आणि ही वारी थांबता कामा नये. 

कारण ही वारी म्हणजेच आयुष्य आहे.


प्रा.दिलीप आनंदराव जाधव, सांगली

                 सचिव

सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली

Post a Comment

0 Comments