Advertisement

Breaking News
Loading...

सामाजिक शास्त्र जगण्याचा मार्ग दाखवते : प्रा. विष्णू विटेकर

 

मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : भौतिक सुखापेक्षा मानसिक समाधान अधिक महत्त्वाचे असून, माणसाच्या जीवनाला योग्य दिशा देण्याचे काम सामाजिक शास्त्र करते. सामाजिक शास्त्र हे केवळ समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र नसून जगण्याचा मार्ग दाखवणारे शास्त्र आहे, असे प्रतिपादन संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर येथील समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. विष्णू विटेकर यांनी केले.

मंद्रूप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात आयोजित सामाजिक शास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप होते.

प्रा. विटेकर म्हणाले की, माणूस भावनाशील आणि समाजशील प्राणी आहे. जिज्ञासेपोटी त्याने श्रवण व वाचनशक्तीचा विकास करून स्वतःमध्ये सातत्याने बदल घडवून आणले. मानवी उत्क्रांतीमध्ये समाजविज्ञानाचा मोठा वाटा आहे. त्यामुळे सामाजिक शास्त्राचा अभ्यास विद्यार्थ्यांच्या जीवनाला व्यापक दृष्टी देतो.

‘रील लाइफ’च्या आहारी जाण्याचा धोका

अलीकडच्या काळात माणसाच्या जीवनपद्धतीत मोठा बदल झाला आहे. माणूस ‘रिअल लाइफ’पेक्षा ‘रील लाइफ’मध्ये अधिक जगताना दिसत आहे. क्षणभंगुर सुखाच्या मागे धावताना कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांना दुय्यम स्थान मिळत आहे. माणूस अधिकाधिक व्यवहारी बनत चालला असून, याचा परिणाम कुटुंबव्यवस्थेवर होत आहे. बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विद्यार्थ्यांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे, असेही प्रा. विटेकर यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एम. एन. जगताप म्हणाले की, सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून समाजातील बदलत्या परिस्थितीचा अभ्यास करून विविध समस्यांवर उपाय शोधता येतात. सामाजिक शास्त्राच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. समाजाविषयी आपुलकीची भावना ठेवून विद्यार्थ्यांनी समाजात राहून स्वतःचा विकास साधला पाहिजे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रा. डॉ. एम. पी. कसबे यांनी केले. प्रा. डॉ. डी. के. देडे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मारुती हजारे यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. आर. एम. मोरे यांनी मानले.



Post a Comment

0 Comments