Advertisement

Breaking News
Loading...

मोहोळ पोलिसांना वाहनांची वानवा; ३ चारचाकी वाहनांसाठी अनिल पाटलांनी प्रशासनाला काय इशारा दिला पहा...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | मोहोळ पोलीस स्टेशनच्या दैनंदिन कामकाजासाठी अपुरी असलेली वाहनांची संख्या वाढवून तातडीने तीन चारचाकी वाहने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी डिजिटल शेतकरी संघटना, शिरापूर (सो.) यांनी केली आहे. याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी पाटील यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

मोहोळ पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा तपास, प्रतिबंधात्मक कारवाई, बंदोबस्त, पेट्रोलिंग तसेच आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळी तातडीने पोहोचणे अशी विविध कामे पोलिसांना करावी लागतात. याशिवाय परिसरातील तीन MIDC आणि इतर शासकीय कामकाजामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना वाहनांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत उपलब्ध असलेली वाहने अपुरी असल्याने एकाच वेळी विविध ठिकाणी बंदोबस्त, गुन्ह्यांचा तपास, पेट्रोलिंग किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास पोलिसांसमोर वाहनांची मोठी अडचण निर्माण होते. त्यामुळे पोलिसांच्या तातडीच्या कार्यवाहीवर मर्यादा येत असल्याचा दावा संघटनेने केला आहे.

“मोहोळ पोलीस स्टेशनसाठी तीन चारचाकी वाहने तात्काळ उपलब्ध करून द्यावीत,” अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे.

दरम्यान, मागणीची तातडीने दखल न घेतल्यास २० ऑगस्ट २०२६ पासून महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये ‘भीक मागो’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा अनिल आबाजी पाटील यांनी दिला आहे.



पोलीस यंत्रणेच्या प्रभावी कामकाजासाठी वाहनांची कमतरता दूर होणार का, याकडे आता मोहोळकरांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments