Advertisement

Breaking News
Loading...

रस्ता-ड्रेनेजच्या प्रश्नावर संताप; १५ ऑगस्टला महापालिका आयुक्तांसमोर ३३ सभासदांच्या आत्मदहनाचा इशारा..!

 


सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | गणेश बिल्डर्स स्कीम नं. ३, रुबीनगरजवळ, जुळे सोलापूर येथील रस्ता व ड्रेनेजचा प्रश्न गेल्या पाच दिवसांपासून गंभीर बनला असून, प्रशासनाने तातडीने प्रश्न सोडवावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचे पाऊल उचलण्याचा इशारा सोसायटीच्या ३३ सभासदांनी दिला आहे.

गणेश बिल्डर्स स्कीम नं. ३ येथे सुमारे १५० कुटुंबे व ६०० रहिवासी वास्तव्यास आहेत. ८ ऑगस्ट रोजी शेजारील प्लॉटधारकाने दोन जेसीबीच्या सहाय्याने सोसायटीचा एकमेव रस्ता खोदून त्याखालील ड्रेनेज लाईन उखडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सदर प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही ही कारवाई करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

रस्ता खोदल्यामुळे सोसायटीचा ये-जा करण्याचा मार्ग बंद झाला असून ड्रेनेजचे सांडपाणी खड्ड्यात साचल्याने परिसरात दुर्गंधी व अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. दूध, भाजीपाला यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्यावरही परिणाम झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

अत्यावश्यक सेवांबाबतही चिंता:

रस्ता बंद असल्याने रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने तसेच अन्य आपत्कालीन सेवा सोसायटीपर्यंत पोहोचू शकणार नाहीत, अशी गंभीर चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. एखादी वैद्यकीय किंवा दुर्घटनेची आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची, असा सवालही रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली होती; मात्र अपेक्षित हस्तक्षेप झाला नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणामागे राजकीय दबाव अथवा राजकीय सुडाची भावना असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला आहे. मात्र या आरोपांबाबत संबंधित व्यक्ती किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही.

महापालिका प्रशासनाला निवेदन:

रस्ता व ड्रेनेजची समस्या तातडीने सोडवावी, संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गणेश बिल्डर्स स्कीम नं. ३च्या सभासदांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. १२ ऑगस्ट रोजी आयुक्त कार्यालयात निवेदन दाखल करण्यात आले आहे.

प्रशासनाने प्रश्नाकडे तातडीने लक्ष न दिल्यास १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महापालिका आयुक्तांसमोर आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्याऐवजी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नागरिकांचा रस्ता व ड्रेनेजचा प्रश्न कायदेशीर पद्धतीने सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील संबंधित व्यक्तींनाही पाठविण्यात आल्या आहेत. आता महापालिका प्रशासन या गंभीर प्रश्नावर कोणती भूमिका घेते आणि नागरिकांना तातडीने रस्ता व ड्रेनेजची सुविधा कधी उपलब्ध करून देते, याकडे परिसराचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

0 Comments