सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | प्रतिनिधी : विजापूर रोड परिसरातील रुबी नगर येथील गणेश बिल्डर्स परिसरातील रस्ता आणि ड्रेनेजचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्याच्या वाटेवरून सुरू असलेला वाद आणि गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या ड्रेनेजच्या गंभीर समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
या समस्येची दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी १५ ऑगस्ट रोजी गणेश बिल्डर्स परिसराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर आज पुन्हा खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. नागरिकांच्या हक्कासाठी थेट आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून, काँग्रेस नेते चेतन नरोटे यांनीही या आंदोलनात सहभाग घेतल्याचे सांगण्यात आले.
“रस्त्याची वाट मिळेपर्यंत येथून उठणार नाही”
गणेश बिल्डर्स स्कीम क्रमांक ३ मधील सुमारे १५० कुटुंबांतील ६०० रहिवाशांचा रस्ता आणि ड्रेनेजचा प्रश्न गेल्या पाच दिवसांपासून गंभीर बनला आहे. रस्त्याचा मार्ग बाधित झाल्यामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शाळकरी मुलांना तसेच नागरिकांना दैनंदिन कामासाठी बाहेर पडणेही कठीण झाले आहे.
त्यातच ड्रेनेजची व्यवस्था बिघडल्याने परिसरात घाण पाणी साचून दुर्गंधी आणि अस्वच्छतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
खासदार प्रणिती शिंदेंकडून पाहणी
“या समस्येची दखल घेऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी १५ ऑगस्ट रोजी गणेश बिल्डर्स परिसराला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. आज पुन्हा त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला,” अशी माहिती नागरिकांकडून देण्यात आली.
दरम्यान, “जोपर्यंत रस्त्याला वाट मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही,” अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली असून रस्त्याचा मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले आहे.
मालकी हक्क व रस्त्याच्या वाटेचा वाद न्यायालयीन प्रक्रियेत
रुबी नगर येथील संबंधित जागेच्या मालकी हक्कासह रस्त्याच्या वाटेबाबतचा प्रश्न न्यायालयीन प्रक्रियेशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जागेचा मालकी हक्क आणि रस्त्याच्या वाटेबाबतचा अंतिम निर्णय हा अधिकृत कागदपत्रे, संबंधित अभिलेख आणि न्यायालयीन आदेशांच्या आधारेच होणे अपेक्षित आहे.
मात्र, न्यायालयीन वादाचा निर्णय होईपर्यंत नागरिकांच्या दैनंदिन ये-जा, रस्ता आणि ड्रेनेजसारख्या मूलभूत सुविधांचा प्रश्न प्रलंबित राहू नये, अशी नागरिकांची भूमिका आहे.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी जोर धरत आहे. खासदार प्रणिती शिंदे यांनी या प्रश्नात लक्ष घातल्याने आता प्रशासन आणि संबंधितांकडून कोणता तोडगा काढला जातो, याकडे रुबी नगरमधील नागरिकांचे लक्ष लागले आहे.









0 Comments