सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी झालेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे शाखेने तब्बल 200 किलोमीटरपर्यंतच्या मार्गावरील 168 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. सलग 8 दिवस तांत्रिक विश्लेषण आणि सातत्यपूर्ण तपास केल्यानंतर पोलिसांनी सोनसाखळी चोरी करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले.
घटनास्थळी थेट CCTV फुटेज उपलब्ध नसल्याने तपासासमोर मोठे आव्हान होते. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शैलेश खेडकर यांच्या पथकातील इमरान जमादार यांनी घटनास्थळाच्या आसपासच्या CCTV कॅमेऱ्यांचे बारकाईने विश्लेषण केले. या फुटेजच्या आधारे संशयित आरोपींचा माग काढण्यात आला.
त्यानंतर सपोनि शैलेश खेडकर यांच्या पथकातील इमरान जमादार, उमेश पवार, विनोद रजपूत, रामा भिंगारे आणि सुरज पवार यांनी आरोपींच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचा मागोवा घेत तब्बल 200 किलोमीटर अंतरावरील 168 CCTV कॅमेऱ्यांची सलग 8 दिवस पडताळणी केली.
CCTV फुटेजसोबत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची निश्चित माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीस गेलेली सोन्याची चैन, गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आणि मोटरसायकल, असा एकूण ₹2 लाख 75 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
घटनास्थळी CCTV नसतानाही तब्बल 200 किलोमीटरपर्यंत CCTV फुटेजचा मागोवा घेत आरोपींपर्यंत पोहोचण्याची ही कारवाई गुन्हे शाखेच्या तपासातील वेगळा आणि उल्लेखनीय अनुभव ठरली आहे.



0 Comments