Advertisement

Breaking News
Loading...

विंचूरमध्ये सिलेंडरचा स्फोट! दोन घरांना भीषण आग; PSI राज डांगे धावले अन् मोठा अनर्थ टळला... दोन घरांचे मोठे नुकसान; संसारोपयोगी साहित्य जळून खाक, ग्रामस्थांच्या मदतीने आग आटोक्यात...

 


दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर |प्रतिनिधी आरिफ नदाफ|

दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे शनिवारी (दि. १२ सप्टेंबर) सकाळच्या सुमारास घरगुती गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीत दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, घरातील संसारोपयोगी साहित्य, धान्य, कपडे आणि अन्य वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विंचूर येथील सुरुबाई देवकते यांच्या घरात सकाळी सुमारे १०.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान अचानक सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. स्फोटानंतर घराला आग लागली आणि काही वेळातच आगीने मोठे स्वरूप धारण केले.

या आगीत सुरुबाई देवकते यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच शेजारील आंबण्णा कोळी यांच्या घरालाही आगीची झळ बसली. दोन्ही घरांतील मोठ्या प्रमाणावर साहित्य आगीत भस्मसात झाले असून, नुकसानीचा आकडा लाखोंच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अग्निशमन दलाची प्रतीक्षा न करता पोलिसांची धाव:

घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी पोलीस हवालदार दावणे, पोलीस शिवणे तसेच होमगार्ड जवानांसह तातडीने घटनास्थळ गाठले.

आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाची वाट न पाहता राज डांगे यांनी ग्रामस्थांना एकत्र करून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसांसह ग्रामस्थांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.

पोलीस उपनिरीक्षक राज डांगे यांनी स्वतः घटनास्थळी राहून बचावकार्याला दिशा दिली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले. राज डांगे यांच्या तातडीच्या प्रतिसादाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, जीवितहानी टळल्याने मोठा अनर्थ टळला.

सिलेंडर स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, तसेच नुकसानीचा नेमका आकडा किती आहे, याबाबतचा तपास मंद्रूप पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.


Post a Comment

0 Comments