दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ (SIR) अंतर्गत २५१-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रारूप यादीबाबत दावे व हरकती नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
मतदार यादी अचूक व दोषरहित करण्याबरोबरच पात्र नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग सुनिश्चित करण्यासाठी हे पुनरीक्षण अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपले तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव तपासून पाहावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी, २५१-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्रमांक २ यांनी केले आहे.
कुठे पाहता येणार मतदार यादी?
२५१-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे, तसेच संबंधित मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. याशिवाय मतदार नोंदणी अधिकारी, २५१-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. २ यांच्या कार्यालयात आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावरही यादी पाहता येणार आहे.
दावे व हरकतींसाठी कोणते अर्ज?
Form 6 – नवीन मतदार नोंदणीसाठी. १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांसाठी नवीन मतदार नोंदणी करता येईल.
Form 7 – मतदार यादीतील चुकीच्या अथवा मृत/स्थानांतरित मतदारांच्या नावाबाबत हरकत नोंदविण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी.
Form 8 – मतदार यादीतील दुरुस्ती, जन्मतारीख/वय, लिंग, पत्ता किंवा नवीन E-EPIC कार्ड मिळविण्यासाठी.
अर्ज कुठे करता येणार?
दावे व हरकतींचे अर्ज संबंधित BLO, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, तहसील कार्यालय दक्षिण सोलापूर, अपर तहसील कार्यालय मंद्रूप, तालुका कृषी अधिकारी दक्षिण सोलापूर, गटविकास अधिकारी पंचायत समिती दक्षिण सोलापूर तसेच सहाय्यक आयुक्त क्र. ४, सोलापूर महानगरपालिका येथे स्वीकारले जाणार आहेत.
याशिवाय नागरिकांना Voter Service Portal (voters.eci.gov.in) द्वारे ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मतदारांनी वेळेत यादी तपासण्याचे आवाहन
मतदार यादीत आपले नाव आहे की नाही, नावातील तपशील अचूक आहेत का, तसेच कुटुंबातील पात्र सदस्यांची नावे समाविष्ट आहेत का, याची नागरिकांनी खात्री करून घ्यावी. काही त्रुटी आढळल्यास किंवा नवीन नाव नोंदवायचे असल्यास ३० सप्टेंबर २०२६पूर्वी संबंधित अर्ज दाखल करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
“जास्तीत जास्त पात्र मतदारांनी व नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन करण्यात आले आहे.



0 Comments