रविवारचा चहा क्रमांक- २२१
कृष्ण का भेटला पाहिजे...!!
आज कृष्णाची आठवण जन्माष्टमी म्हणून येत नाही. ती येते एका खोल पोकळीमुळे.
आपल्या घरात उजेड देणारे दिवे वाढले आहेत, पण मनातला काळोख अधिकच दाट झाला आहे. हातात सगळ्या जगाशी जोडणारा फोन आहे, पण शेजारी बसलेल्या माणसाशी जोडणारा धागा तुटला आहे. हजारो लोकांच्या गर्दीत आपण एकटे पडलो आहोत. बोलायला सगळे आहे, पण ऐकायला कोणीच नाही. याच एकटेपणात कृष्णाची मुरली पुन्हा ऐकू यावीशी वाटते.
तो द्वारकेचा राजा म्हणून नको. तो यशोदेच्या अंगणात लोणी चोरणारा, सुदाम्याच्या खांद्यावर हात ठेवणारा, अर्जुनाच्या रथाचे लगाम धरणारा सखा म्हणून हवा आहे.
कधी काळी नाती रक्ताची असायची. आता ती सोयीची झाली आहेत. उपयोग आहे तोवर नाते आहे, उपयोग संपला की निरोप.
आज आपण नात्याला जपत नाही, वापरतो. व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड झालेल्या शुभेच्छा आणि वाढदिवसाच्या दिवशी टाकलेली स्टोरी, एवढ्यावरच आपुलकी संपते. आपुलकीचा तो रेशमी धागा आता नायलॉनचा झाला आहे. दिसायला चकचकीत, पण ओढला की कापणारा आणि गळ्याला आवळणारा.
कृष्णाने नात्याचे हे अर्थशास्त्र कधीच मानले नाही. तो नात्यांचे गणित चुकला आणि म्हणूनच अमर झाला.
तो यशोदेचा पोटचा नव्हता, पण तिचे वात्सल्य त्याच्याशिवाय अपूर्ण होते. तो नंदाचा अंश नव्हता, पण त्याच्या म्हातारपणाची काठी तोच होता. सुदामा त्याला राजवैभव देऊ शकत नव्हता, फक्त मूठभर पोहे देऊ शकत होता. पण कृष्णाने त्या पोह्यांमध्ये जी श्रीमंती पाहिली, ती आजच्या पाच पंचतारांकित हॉटेलच्या मेजवानीतही सापडत नाही.
सुदाम्याच्या पोह्यांची गोष्ट ही गरिबीची गोष्ट नाही, ती मैत्रीच्या श्रीमंतीची गोष्ट आहे. माझ्याकडे काय आहे, यापेक्षा मी कोणासाठी आहे, हे महत्त्वाचे असते, हे कृष्णाने शिकवले.
म्हणून आज कृष्ण भेटला पाहिजे, आपल्याला पुन्हा एकदा नातं म्हणजे काय, हे शिकवायला. नातं हे नावापुरते नसते, ते निभावण्यापुरते असते.
कधी नव्हे इतके शब्द आज आपल्याभोवती आहेत. प्रत्येकजण बोलत आहे. प्रत्येकजण ओरडत आहे. प्रत्येकजण आपले मत आकाशात भिरकावत आहे. सोशल मीडियाच्या महापुरात आपण बुडत चाललो आहोत.
पण या गोंगाटात सत्याचा आवाज क्षीण झाला आहे. खोटे आज आकर्षक झाले आहे. ते रंगवले असते, सजवलेले असते, ते सोपे असते. ते हजारो लाईक्स मिळवते. सत्य मात्र आजही एकाकी वाटेवरून अनवाणी चालते. ते कधीच गोंगाट करत नाही.
कृष्ण हा शब्दांचा जादूगारणण्याचे त्याच्या एका वाक्याने अर्जुनाचा आयुष्यभराचा संभ्रम दूर झाला. पण त्याच्या शब्दामागे आचरणाचे बळ होते. तो गीता फक्त बोलला नाही, तो गीता जगला.
आज आपल्याला असाच कृष्ण हवा आहे, जो सांगेल की काही वेळा मौन हे पाप असते. जिथे अन्याय घडतो आणि आपण मान खाली घालून निघून जातो, तिथे आपले मौन हाच अन्यायाला दिलेला सर्वात मोठा आशीर्वाद असतो.
खोट्याच्या बाजारात उभे राहून सत्याची किंमत सांगणारा एक कृष्ण आज पुन्हा हवा आहे. विवेकाची विझलेली मशाल पुन्हा पेटवायला हवा आहे.
कुरुक्षेत्र आता कुरुक्षेत्रावर नाही. ते आपल्या प्रत्येकाच्या छातीत उभे आहे.
सकाळी डोळे उघडल्यापासून रात्री मिटेपर्यंत आपण लढतोच आहोत. एका बाजूला उभा आहे स्वार्थ - मला काय मिळेल? माझा फायदा काय? मी कसा मोठा दिसेन? दुसऱ्या बाजूला उभे आहे कर्तव्य - मी काय दिले पाहिजे? माझी जबाबदारी काय? माणूस म्हणून माझे देणे काय?
हा लढा तलवारीचा नाही, हा लढा निर्णयाचा आहे. आणि इथे शस्त्राची गरज नाही, सारथ्याची गरज आहे.
अर्जुनाकडे सगळे होते. गांडीव होते, अक्षय भाता होता, श्रीकृष्णासारखा मित्र होता. तरीही तो खचला. कारण शक्ती असून दिशा नसेल, तर माणूस स्वतःच्याच शक्तीने घायाळ होतो.
कृष्णाने त्या दिवशी शस्त्र उचलले नाही. त्याने फक्त लगाम हाती घेतला. त्याने रथ हाकला नाही, त्याने दृष्टी दिली. त्याने सांगितले, जिंकण्यापेक्षा कर्तव्य मोठे असते. फळापेक्षा कर्म श्रेष्ठ असते.
आज प्रत्येक तरुणाच्या मनात, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये, प्रत्येक घरात हाच संभ्रम आहे. पुढे काय करू? योग्य काय आणि सोपे काय यातून निवड कशी करू? त्या प्रत्येकाला रथावर बसून गीता सांगणारा नाही, तर शेजारी बसून "घाबरू नकोस, तुझे कर्म तू कर" असे सांगणारा कृष्ण हवा आहे.
इमारती उंच झाल्या. हुद्दे मोठे झाले. अधिकारांचे आकडे वाढले. पण माणुसकीची पायरी मात्र दिवसेंदिवस खोल जात आहे की काय, अशी भीती वाटते.
राजधर्म म्हणजे काय, हे कृष्णाइतके सुंदर कोणीच दाखवले नाही. तो स्वतः राजा होऊ शकला असता. त्याने सोन्याची द्वारका वसवली, पण तो कधीच सोन्याच्या सिंहासनाला चिकटला नाही. तो सत्तेत राहिला, पण सत्तेचा कधीच झाला नाही.
जेव्हा तो सुदाम्याच्या पायावर पाणी घालतो, तेव्हा तो द्वारकाधीश नसतो, तो फक्त सुदाम्याचा श्रीदामा असतो. जेव्हा तो द्रौपदीच्या हाकेला धावतो, तेव्हा तो देव नसतो, तो एक भाऊ असतो, जो बहिणीच्या अब्रूसाठी धावतो.
आज सत्तेच्या प्रत्येक खुर्चीवर हीच जाणीव हवी आहे. सत्ता म्हणजे भोग नाही, ती एक अखंड जबाबदारी आहे. मुकुट म्हणजे मान नाही, तो काट्यांचा आहे. हे सांगायला एक कृष्ण पुन्हा प्रत्येक कार्यालयात, प्रत्येक मंत्रालयात, प्रत्येक घराच्या कर्त्या माणसाच्या मनात जन्माला यायला हवा.
कृष्ण म्हणजे फक्त मुरली नाही. मुरली हे त्याच्या रुपाचे एक आभूषण आहे, त्याच्या स्वरूपाचे नाही.
कृष्ण म्हणजे विवेकाची धून आहे. जिथे सगळा गोंधळ आहे, जिथे सगळे सूर बेसूर झाले आहेत, तिथेही एक सुंदर राग सापडू शकतो, ही श्रद्धा म्हणजे कृष्ण.
कृष्ण म्हणजे संकटात उभा राहणारा धीर आहे. सगळे सोडून गेले, तरी "मी आहे" असे छातीवर हात ठेवून सांगणारा विश्वास म्हणजे कृष्ण.
कृष्ण म्हणजे अंधारात दिशा दाखवणारा नूर आहे. वाटच दिसत नाही, तेव्हा डोळ्यात तेवणारा छोटासा दिवा म्हणजे कृष्ण.
तो शस्त्र उचलत नाही, पण अन्यायाला शरणही जात नाही. हीच तर खरी ताकद आहे. शस्त्र उचलणे सोपे आहे, शिवी देणे सोपे आहे. पण शस्त्र न उचलता, शिवी न देता, सत्याच्या बाजूने ठाम उभे राहणे, यासाठी छाती लागते. कृष्णाकडे ती छाती होती.म्हणून आज आपल्याला मंदिरातल्या मूर्तीमधला कृष्ण नकोच आहे असे नाही, पण तो पुरेसा नाही. धूप आहे, दीप आहे, फुले आहेत, नैवेद्य आहे. पूजा सुरू आहे.
पण आता पूजा निर्णयात हवी आहे. ओठांवरचे नामस्मरण खूप झाले, आता आचरणातले सत्य हवे आहे.
आज जगाला चमत्कार करणारा कृष्ण नको आहे. त्या काळी यमुना अडवावी लागली, गोवर्धन उचलावा लागला. आजचा चमत्कार वेगळा आहे. आजचा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे कठोर झालेल्या काळजात पुन्हा प्रेमाचा पाझर फुटणे. माणसातला माणूस जागा होणे, हाच आजचा खरा चमत्कार आहे.
मुकुट घालून सिंहासनावर बसणारा कृष्ण आज नको. कारण सिंहासनावर बसणारे आपल्याला पावलोपावली भेटतात. आज हवा आहे तो दुःखाच्या क्षणी खांद्यावर हात ठेवणारा कृष्ण. कारण खांद्यावर हात ठेवणारा एकही भेटला नाही, तर सिंहासनाचा काय उपयोग?
हे कृष्णा, तुला पुन्हा अवतार घ्यायला सांगणार नाही. तुला पुन्हा गोकुळात यायला सांगणार नाही. फक्त प्रत्येक अंतःकरणात थोडासा तू जागा हो.
जिथे लोभ आहे तिथे समाधानाची एक छोटी तळी होऊ दे.
जिथे द्वेष आहे तिथे प्रेमाचा एक छोटा झरा वाहू दे.
जिथे भीती आहे तिथे धैर्याची एक छोटी ज्योत लागू दे.
जिथे अन्याय आहे तिथे निर्भयतेचा एक स्पष्ट स्वर उमटू दे.
कृष्णाला शोधू नका गोकुळाच्या वाटेवर. तिथे आता फक्त पर्यटन आहे, कृष्ण नाही.
तो सापडेल तुमच्या कृतीच्या घाटावर. तुम्ही एखाद्याला मदत करता तेव्हा तो तुमच्या हातात असेल.
कृष्णाला शोधू नका फक्त देव्हाऱ्यात. तिथे तो मूर्ती म्हणून आहेच.
तो दिसेल एखाद्याच्या अश्रू पुसणाऱ्या हातात. तुम्ही जेव्हा कोणाचेतरी अश्रू पुसता, तेव्हा ती बोटे तुमची नसतात, ती त्याची असतात.
गीता वाचूनही जर कर्म चुकले, तर शब्द सारे व्यर्थ ठरतील. हजार पारायणे केली, पण वागण्यात तोच स्वार्थ, तोच लोभ, तोच मत्सर राहिला, तर ती पोथी फक्त कागदाचा गठ्ठा ठरते.
कृष्णाला वंदूनही जर माणूस हरवला, तर देव्हारे सारे रिकामे उरतील. दिवे लावले, फुले वाहिली, पण मनातला दिवा विझलाच राहिला तर त्या प्रकाशाचा काय उपयोग?
म्हणून आज कृष्णाने यायचे नाही, आपणच कृष्णाच्या विचारांनी जगायचे आहे.
अर्जुन शोधायचा नाही, आपल्यातील संभ्रम हरवायचा आहे.
कुरुक्षेत्र संपवायचे नाही, त्यावर सत्याचा विजय घडवायचा आहे.
ज्या दिवशी दुसऱ्याच्या दुःखाने आपले डोळे नकळत ओलावतील,
ज्या दिवशी अन्याय पाहून आपले पाऊल थांबणार नाही, तर अन्यायाच्या समोर उभे राहील,
ज्या दिवशी सत्यासाठी आवाज द्यायला काळजाला भीती वाटणार नाही,
आणि ज्या दिवशी समोरच्या माणसातही आपल्याला देव दिसायला लागेल...त्या दिवशी समजा, कृष्ण भेटला आहे.
देव्हाऱ्यात नाही, तर आपल्या अंतःकरणात भेटला आहे.
मूर्तीत नाही, तर आपल्या माणुसकीत भेटला आहे.आणि ज्या दिवशी तो असा भेटेल, त्याच दिवशी आपली खरी जन्माष्टमी साजरी होईल.
प्रा.दिलीप आनंदराव जाधव ,सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.
सचिव
सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना सांगली.



0 Comments