Advertisement

Breaking News
Loading...

साखर कारखान्याच्या गेटवर भरली जिल्हा परिषद शाळा..! शाळेकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद केल्याचा आरोप; विद्यार्थ्यांसह प्रहार संघटनेचा आंदोलनाचा इशारा...

 


 दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | तालुका प्रतिनिधी आरिफ भाई नदाफ |औराद शिवारातील शेंडगे वस्ती येथे लोकशक्ती साखर कारखान्याच्या परिसरात जिल्हा परिषद शाळा सुरू असून, शाळेकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता कारखाना प्रशासनाने बंद केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांची ये-जा अडचणीची झाली असून, या प्रकरणी प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

या शाळेत पहिली ते चौथीपर्यंत चार वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत. आजपर्यंत विद्यार्थी व शिक्षकांची शाळेत ये-जा सुरळीत सुरू होती. मात्र, शाळेकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय शेतकरी व विद्यार्थ्यांना दमदाटी केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच प्रहार संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन संबंधित पोलीस ठाणे तसेच तहसीलदार कार्यालयात जाऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी प्रहार संघटनेचे अजित भाऊ कुलकर्णी यांनी, “विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या मार्गात कोणताही अडथळा निर्माण होऊ देणार नाही. दोन दिवसांत शाळेचा रस्ता खुला झाला नाही, तर विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा दिला.

दरम्यान, शाळेचा रस्ता नेमका कोणत्या कारणामुळे बंद करण्यात आला, विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्यास बंधने का घालण्यात आली, याची प्रशासनाने तातडीने चौकशी करून शाळेचा रस्ता खुला करावा, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.





Post a Comment

0 Comments