Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- २२७ घटातला दिवा आणि मनातला दिवा...

 


रविवारचा चहा क्रमांक- २२७

घटातला दिवा आणि मनातला दिवा

नवरात्र सुरू झालं की घराघरांत एक वेगळीच प्रसन्नता येते. अंगण सारवलं जातं, घर स्वच्छ केलं जातं. भिंतीवरची जळमटं काढली जातात, तशीच मनातलीही जळमटं काढावीत असं वाटतं. परसातल्या झेंडूला बहर येतो आणि दारात तोरण लागते. घट बसवला जातो, दिवा लावला जातो, उपवास केले जातात. नऊ दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. शंख, घंटा, आरती आणि साडीच्या घडीसारखा सोवळा सुगंध - सगळं कसं पवित्र वाटतं.

पण कधी कधी या सगळ्या पवित्रतेच्या मधोमध मनात एक छोटा, पण टोचणारा प्रश्न येतो - आपण ज्या देवीची इतक्या श्रद्धेने पूजा करतो, तिच्या विचारांप्रमाणे जगतो का? आपल्या पूजेचा प्रकाश फक्त देवघरापुरता मर्यादित आहे, की तो आपल्या जगण्यापर्यंत पोहोचतो?

हा प्रश्न विचारणे म्हणजे श्रद्धेवर शंका घेणे नाही. उलट, श्रद्धेला अधिक खोल अर्थ देणे आहे.

देवीने महिषासुराचा वध केला, ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. आई आजीच्या तोंडून सांगायची, शाळेच्या पुस्तकात वाचली, टीव्हीवर पाहिली. वाईटावर चांगल्याचा विजय झाला, अन्यायावर न्यायाचा विजय झाला, ही या कथेतली शिकवण. आपण टाळ्या वाजवायचो, देवीचा जयजयकार करायचो.

पण आजच्या काळात महिषासुर नेहमी राक्षसाच्या रूपातच समोर येत नाही. त्याला आता शिंगे नाहीत, सुळे नाहीत. तो कधी गोड बोलणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यामागे लपलेला असतो, तर कधी आपल्या आजूबाजूच्या चुकीच्या विचारांत असतो.

स्त्रीचा अपमान करणारा, तिच्या स्वप्नांना कमी लेखणारा, तिच्यावर बंधनं घालणारा विचारही एका प्रकारचा महिषासुरच नाही का? "तू मुलगी आहेस, तुला हे जमणार नाही" असे म्हणणारा बाप, "नोकरी कशाला करतेस, घर बघ" म्हणणारा नवरा, "पोरगी शिकून काय करणार" म्हणणारा समाज - हे सगळे महिषासुराचे नवे अवतार नाहीत का?

मुलगा आणि मुलगी यांच्यात फरक करणारा, हुंड्यासाठी सुनेला छळणारा, रस्त्यावरून जाणाऱ्या मुलीला वाईट नजरेने पाहणारा विचारही महिषासुरच.

आणि दुर्दैव म्हणजे, या महिषासुराला आपण अनेकदा परंपरा, प्रतिष्ठा आणि 'लोक काय म्हणतील' या नावाखाली स्वतःच जिवंत ठेवतो. देवीच्या फोटोला हार घालतो आणि घरातल्या जिवंत देवीला - आईला, बायकोला, मुलीला - अपमानाच्या अंधारात ठेवतो. हा विरोधाभास नाही का?

मला वाटतं, नवरात्र म्हणजे फक्त देवीची पूजा करण्याचे नऊ दिवस नाहीत. स्वतःच्या मनात डोकावून पाहण्याचे हे दिवस आहेत. आपल्या मनातला महिषासुर ओळखण्याचे आणि त्याला मारण्याचे दिवस आहेत.

नवरात्र सुरू झालं की घरात घटस्थापना होते. मातीच्या घटात धान्य पेरलं जातं, त्यावर पाणी घातलं जातं आणि नऊ दिवस त्याची काळजी घेतली जाते. त्या धान्याला अंकुर फुटताना पाहून मन प्रसन्न होतं. जीवन फुटतंय, या विचारानेच आशा वाटते.

पण कधी विचार केला आहे का, आपल्या शरीररूपी घटाची आपण किती काळजी घेतो?

घटस्थापना म्हणजे केवळ मातीच्या घटाची स्थापना नव्हे, तर आपल्या मनात चांगल्या विचारांची स्थापना करणं. देवाने दिलेलं हे शरीर म्हणजे आपल्याला मिळालेली एक संधी आहे. या शरीराच्या माध्यमातून आपण कितीतरी गोष्टी करू शकतो. कुणाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो, अडचणीत असलेल्या माणसाला मदत करू शकतो, एखाद्या निराश व्यक्तीला पुन्हा जगण्याची उमेद देऊ शकतो.

आपल्याकडे पैसा असेल तर मदत करावी, शब्द असतील तर एखाद्याला धीर द्यावा आणि अनुभव असेल तर योग्य वेळी तो दुसऱ्याच्या उपयोगी आणावा. हीसुद्धा एक प्रकारची उपासना आहे.

पण अनेकदा आपण आपलं संपूर्ण आयुष्य फक्त स्वतःसाठी जगण्यात घालवतो. माझं घर, माझी मुलं, माझा संसार, माझं सुख, माझी प्रतिष्ठा या सगळ्यांत आपण इतके गुंततो की आपल्या आजूबाजूला कोण दुःखी आहे, कोणाला आपल्या मदतीची गरज आहे, हे पाहायलाही आपल्याला वेळ मिळत नाही.

घटाची काळजी घेणे म्हणजे रोज पाणी घालणे. मनाच्या घटाची काळजी घेणे म्हणजे रोज चांगला विचार पेरने. आपण देवाच्या चरणी फुलं वाहतो; पण एखाद्या जिवंत माणसाच्या आयुष्यात आनंदाचं एक फूल फुलवू शकतो का, हा प्रश्न स्वतःला विचारायला हवा.

अखंड नंदादीप लावतो आपण. सकाळ-संध्याकाळ त्यात तेल घालतो, वात नीट करतो, दिवा विझू नये याची काळजी घेतो. दिव्याचा प्रकाश देवघर उजळतो.

पण आपल्या मनातला दिवा मात्र अनेकदा विझलेला असतो. दुसऱ्याचं चांगलं झालं की मनात मत्सर निर्माण होतो, कुणी आपल्यापेक्षा पुढे गेलं की वाईट वाटतं, कुणी चूक केली की त्याला माफ करण्याऐवजी त्याची चूक पुन्हा पुन्हा आठवली जाते. मग देवासमोर लावलेल्या दिव्याचा प्रकाश आपल्या मनापर्यंत पोहोचतो का?

माझ्या मते, आपल्या मनात माणुसकीचा, प्रामाणिकपणाचा आणि संवेदनशीलतेचा दिवा अखंड तेवत ठेवणं अधिक महत्त्वाचं आहे. तो दिवा तेवत असेल तरच देवघरातला दिवा सार्थकी लागतो. नाहीतर तो फक्त तेल आणि वात जाळत राहतो, प्रकाश देते

आज समाजाला जागरणाची गरज आहे. पण हे जागरण केवळ रात्रभर देवीसमोर बसण्यापुरतं मर्यादित नसावं.

खरा जागर कशाचा? एखाद्या मुलीवर अन्याय होत असेल तर तिच्या बाजूने उभं राहणं, हे जागरण. घरात स्त्रीला कमी लेखलं जात असेल तर त्याविरुद्ध बोलणं, हे जागरण. वृद्ध आई-वडिलांना ओझं समजलं जात असेल तर त्यांना माणुसकीने वागवणं, हे जागरण. जाती-धर्माच्या नावावर माणसांमध्ये भिंती उभ्या केल्या जात असतील तर त्या भिंती नाकारण्याची हिंमत ठेवणं, हा खरा जागर आहे.


प्रा. दिलीप आनंदराव जाधव

       सचिव

सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना , सांगली.



Post a Comment

0 Comments