सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | शासकीय बिलाच्या रकमेवरून झालेल्या वादातून दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रोजगार हमी योजना (रोहयो) विभागात कंत्राटी ऑपरेटर म्हणून काम केलेल्या राहुल शांतिकुमार गायकवाड (रा. अभिषेक नगर, मुरारजी पेठ, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
तहसीलदार किरण जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संबंधित व्यक्तीने १६ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्याच्या मागणीवरून उपजिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन वाद घातल्याचा आरोप आहे. आठ दिवसांत पैसे दिले नाहीत, तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
बनावट स्वाक्षऱ्या करून बिले काढल्याचाही आरोप
तहसीलदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून बिले काढल्याचा तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळात वाहनांसंदर्भातील कंत्राटी कामे आणि बिले मिळविल्यानंतर पुन्हा कथित बोगस बिले सादर केल्याचा आरोपही संबंधित व्यक्तीवर करण्यात आला आहे. या बिलांच्या मंजुरीवरूनच तहसीलदारांशी वाद झाल्याचे सांगण्यात येते.
पत्नीच्या निलंबनाचाही वादाशी संबंध?
संबंधित व्यक्तीची पत्नी कोतवाल म्हणून कार्यरत होती. तिच्याविरोधात ग्रामस्थांनी लेखी तक्रार दिल्यानंतर सुनावणी घेऊन तहसीलदारांनी तिला निलंबित केले होते. या कारवाईचा राग मनात धरून संबंधित व्यक्तीने निवडणुकीच्या कामकाजादरम्यान गोंधळ घातला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक केली. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. सहायक पोलीस निरीक्षक राहुल सावंत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

0 Comments