सोलापूर शहर प्रतिनिधी (हॅलो रिपोर्टर न्यूज )– शहरातील स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत सेवांची गुणवत्ता प्रत्यक्ष तपासण्यासाठी आज महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी व्यापक पाहणी दौरा केला. या दौऱ्यात सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, विभागीय अधिकारी विजयकुमार लोखंडे, जावेद पानगल, राघवेंद्र गायधनकर, मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांसह विविध विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.
दौऱ्यादरम्यान शहरातील अनेक भागांत प्रत्यक्ष भेट देऊन सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. काही ठिकाणी अनियमितता व आवश्यक सुधारणा आढळल्याने आयुक्तांनी तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
बुद्धनगर फॉरेस्ट एरिया – ड्रेनेज व स्वच्छता:
सार्वजनिक शौचालयांच्या ड्रेनेज लाईनमध्ये समस्या असल्याचे आढळल्याने उपलब्ध जोडण्यांची पुनर्तपासणी करून choke-up दूर करण्याचे आदेश देण्यात आले. परिसरातील वाढलेली झुडपे तातडीने हटवून स्वच्छता सुनिश्चित करण्यास सांगण्यात आले.
सार्वजनिक नळांचा फेर सर्व्हेक्षण:
विभागांकडून घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये काही सार्वजनिक नळांचा समावेश नसल्याचे समोर आल्यानंतर पुन्हा एकदा अचूक सर्व्हे करून सुधारित यादी सादर करण्याचे निर्देश दिले. अनधिकृत सार्व. नळ जोड निश्चित SOP नुसार बंद करून रहिवाशांना विधिसम्मत सेपरेट नळजोड देण्यास गती देण्याचे आदेश देण्यात आले.
सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती व नवीन बोअरची गरज:
रामवाडी, गुलाबनगर, मौलाली चौक आणि लोधी गल्ली परिसरातील शौचालयांची पाहणी करताना काही ठिकाणी भूमिगत पाण्याची पातळी कमी असल्याने नवीन इलेक्ट्रिक बोअर आवश्यक असल्याचे दिसून आले. त्यासाठीचे एकत्रित सर्वेक्षण पुढील 7 दिवसांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
निष्क्रिय शौचालयांचे पाडकाम — Salvage Value योजना:
वापरात नसलेल्या शौचालयांचे पाडकाम महापालिकेवर कोणताही आर्थिक बोजा न येता Salvage Value पद्धतीने करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे सांगण्यात आले.
लोधी गल्ली – नवीन सार्वजनिक शौचालय:
पाण्याच्या टाकीजवळील कंपाउंड व वॉललगत पुरुषांसाठी नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले.
अरुंद बोळ्यांतील कचरा व्यवस्थापन:
घंटा गाडी न पोहोचणाऱ्या अरुंद बोळ्यांमध्ये अतिरिक्त महिला कर्मचारी नेमून कचरा उचलण्याची कार्यवाही तत्काळ सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले.
दौऱ्यानंतर आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी संबंधित विभागांना तात्काळ व प्रभावी कार्यवाही करून शहरातील स्वच्छता, सुविधा आणि सेवांची गुणवत्ता उंचावण्याचे आदेश दिले.
सोलापूर महानगरपालिका नागरिकांना उत्तम नागरी सुविधा आणि स्वच्छ शहर निर्मितीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.





0 Comments