शिरापूर (ता: मोहोळ): शिरापूर ते लोकमंगल रस्ता गेल्या आठ–नऊ वर्षांपासून अत्यंत खराब अवस्थेत असून अनेकदा निवेदने, आंदोलने, कार्यालयीन चकरा आणि मुंबईपर्यंत धाव घेऊनही दुरुस्तीचे काम सुरू झालेले नाही. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असल्यामुळे शिरापूरसह सात–आठ गावांची वाहतूक ठप्प होत आहे.
सध्या लोकमंगल साखर कारखाना सुरू असून ऊस वाहतुकीवर मोठा परिणाम होत आहे. खराब रस्त्यामुळे ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि वाहतूक साधनांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. शेतकऱ्यांचा उस वेळेत कारखान्यात पोहोचत नसल्याची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल आबाजी पाटील यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, “दहा डिसेंबरपर्यंत हा रस्ता दुरुस्तीसाठी मंजुरी देऊन काम सुरू झाले नाही, तर 11 डिसेंबर 2025 पासून मला महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालये, आमदार–खासदार यांच्या कार्यालयांत जाऊन ‘भिक मागून’ या रस्त्याचे काम करावे लागेल. माझ्या भागातील नागरिकांसाठी भिक मागताना मला कमीपणा वाटणार नाही.”
पाटील यांनी आशा व्यक्त केली की सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार गोरे ही वेळ येऊ देणार नाहीत आणि दहा तारखेपर्यंत कामाला मंजुरी देतील. परंतु “पालकमंत्री यांनीही दुर्लक्ष केल्यास 12 तारखेपासून भिकेवर जमा झालेल्या निधीतून रस्त्याचे काम सुरू करणार” असा त्यांचा ठाम इशारा आहे.

0 Comments