Advertisement

Breaking News
Loading...

“घरकुल लाभार्थ्यांना वाळू नाही; 12 तारखेपर्यंत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अन्यथा 13 रोजी शेतकरी संघटनेचा थेट वाळू उपसा”: अनिल पाटील

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी: 

मौजे शिरापूर (सो), ता. मोहोळ येथील प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या 56 घरकुल लाभार्थ्यांना अद्याप वाळू उपलब्ध न झाल्याने घरकुल बांधकाम रखडले आहे. या पार्श्वभूमीवर डिजिटल शेतकरी संघटना शिरापूर (सो) यांच्या वतीने माननीय तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी निवेदन देण्यात आले आहे.


संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल अबाजी पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शिरापूर (सो) येथील गट क्रमांक 12 व 13 मधील नदीपात्रातून वाळू उपसा करण्यास परवानगी द्यावी, जेणेकरून लाभार्थ्यांचे घरकुल तात्काळ पूर्ण होऊ शकतील. यासाठी 56 लाभार्थ्यांच्या वतीने प्रत्येकी 600 रुपये ब्रास प्रमाणे एकूण 1 लाख 68 हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार कार्यालयाकडे जमा करण्यात आला आहे.


निवेदनात पुढे असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, दिनांक 12 जानेवारी 2026 पर्यंत वाळू उपलब्ध करून दिली नाही, तर 13 जानेवारी 2026 रोजी पाच ट्रॅक्टरच्या सहाय्याने शिरापूर येथील सिना नदीतील बंधाऱ्यापासून वाळू उचलण्यास सुरुवात केली जाईल. ही कारवाई घरकुल लाभार्थ्यांच्या हितासाठी असून, या प्रकरणात माझ्यावर किंवा वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कोणतीही गुन्हेगारी कारवाई करू नये, अशी विनंती प्रशासनाला करण्यात आली आहे.


या निवेदनासोबत ग्रामपंचायत शिरापूर (सो) यांचे पत्र, घरकुल लाभार्थ्यांची यादी तसेच बँक ऑफ इंडिया, मोहोळ शाखेचा धनादेश क्रमांक 117706 जोडण्यात आला आहे.


आता प्रशासन 12 जानेवारीपर्यंत काय निर्णय घेते, याकडे घरकुल लाभार्थ्यांसह संपूर्ण शिरापूर गावाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

0 Comments