आपल्याला आयुष्यातील अनेक गोष्टी आधी कळतात सण येणार, पाऊस येणार, थंडी वाढणार…पण आपला शेवट कधीच सांगून येत नाही. कोणाची शेवटची भेट? कोणाचं शेवटचं हसू? कोणता संवाद शेवटचा ठरेल? कोणाला आलिंगन देण्याची ती शेवटची संधी? आणि म्हणूनच हे जीवन असं बोलत नाही “मी उद्यापर्यंत थांबतो, तू आज रुस.” कारण, जीवनाला "नंतर" समजतच नाही. आपण माणूस आहोत. आपल्याला राग येतो, अपेक्षा असतात. कधी कुणी शब्द चुकून बोलतं, कधी आपण जास्त मनावर घेतो, आणि मग सुरू होतं- रुसण्याचं, अंतर वाढवण्याचं, आणि ‘नंतर बोलू’ या खोट्या आश्वासनाचं चक्र.
खरं तर “नंतर बोलू” म्हणजे काय? काय आहे ते नंतर? कोणत्या कॅलेंडरवर लिहिलंय ते नंतरचं? आपण उद्या भेटू याची काय खात्री आहे? आपण बोलणार याची काय खात्री आहे? आपण ज्याच्यासाठी रुसलो आहोत, तोच उद्या असेल याची काय खात्री आहे?
आपण एखाद्यावर रुसतो, अबोला धरतो आणि मनात बोलतो, "नंतर बोलू, नंतर सगळं ठीक होईल."
पण आयुष्याला "नंतर" समजत नाही, कधी कोणती भेट शेवटची ठरेल हे कोणालाच माहीत नाही. म्हणून, राग-रुसवा-अबोला सोडा, माणसं जपा आणि मनात जे काही आहे, ते आजच बोला... कारण, आयुष्य थांबत नाही, पण न बोलल्याचं दुःख मात्र आयुष्यभर सोबतीला राहतं...
एक छोटी गोष्ट... एका घरात भांडण झालं. आई रागावली, मुलगा चिडला. आईने मनात म्हटलं“उद्या बोलू.” मुलानेही मनात म्हटलं“उद्या माफी मागतो.”
पण दुसऱ्या दिवशी सकाळी… आई जागीच झाली नाही. तो आईच्या शेजारी बसून म्हणत होता, “आई, उठ… मी बोलतोय… मी माफी मागतो… मी नको बोलू म्हटलं होतं, पण आता बोलतोय…”
पण आई शांत होती. या वेळेस शांतता कायमची होती. कारण शेवट कधीच सांगून येत नाही. पण न बोलल्याचं दुःख आयुष्यभर जिवंत राहतं.
आता त्या मुलाचं आयुष्य पुढे चालू आहे… पण एक प्रश्न मात्र कायम आहे “त्या दिवशी मी का नाही बोललो?” न बोलेल्या शब्दांचा बोचरा काटा, माफी मागायची संधी न मिळण्याची तगमग, आणि ‘मी बोललो असतो तर’ या वाक्याने आयुष्यभर त्रस्त.
मनातलं बोलायला शिका… कारण न बोलणंच खूप जड असतं. कधी कधी आपल्याकडून शब्द बोलले जात नाहीत, कारण अहंकार मोठा असतो, असूया असते, वा “मी का आधी का बोलू?” असा प्रश्न असतो.
पण विचार करा— तुम्ही ज्या गोष्टीवर रुसला आहात ती महत्त्वाची आहे का? की ज्याच्यावर रुसला आहात ती व्यक्ती अधिक महत्त्वाची आहे?
जीवनात एक नियम शिकला पाहिजे: मनातल्या गोष्टी मनात ठेवू नका. मन माणसांवर ठेवा, गैरसमजांवर नाही. राग सोडणं म्हणजे पराभव नाही… ते प्रेमाचं धैर्य आहे.
कधी कधी आपण समजतो की मी आधी बोललो, तर मी कमी पडेन. पण वस्तुस्थिती उलट आहे जे लोक आधी बोलतात, ते दुर्बल नसतात, ते मोठ्या मनाचे असतात. राग ठेवणं सोपं असतं, पण राग सोडणं— ते धैर्याचं काम आहे. ते प्रेमाचं काम आहे.
आजूबाजूला पहा. किती चेहरे बदलले, किती नाती दूर गेली, किती लोकं आता आपल्यात नाहीत. कधी कधी आपण विचार करतो. “उद्या फोन करतो…” “उद्या भेटू…” “उद्या बोलू…”
पण तो “उद्या” आलाच नाही आणि कधी कधी उद्या ती व्यक्ती ही राहिली नाही. आणि आयुष्य एक गोष्ट शिकवतं जे बोललात ते कधीच पश्चात्ताप होत नाही. जे बोललंच जातं त्याचंच आयुष्यभर दुख होतं.
नात्यांमध्ये संवाद म्हणजे प्राणवायू असतो. नातं मोडत नाही ते थांबतं…ते गुदमरायला लागतं. कारण संवाद बंद होतो. अबोलपणा म्हणजे शांतता नाही. अबोलपणा म्हणजे मृत नातं.
त्या शांततेत एकच आवाज असतो पश्चात्तापाचा. तुमच्याकडे अजून वेळ आहे. पण किती? हे सांगता येत नाही. शेवट येतो तेव्हा मागे एकच प्रश्न— “मी का थांबलो?”
तुमच्या मनात आज कोणाबद्दल काही आहे? कुणाची आठवण येते? कुणावर रुसलेले आहात?, कुणाला काही सांगायचं होतं?, आज बोला. आता बोला. संधी हातची जाऊ देऊ नका.
कधी कधी एखादा छोटा शब्दच “माफ कर” किंवा “तुझी आठवण आली” हा एकच शब्द नातं पुन्हा जिवंत करतो.
“मनात काहीही ठेवू नका” हो, शेवट सांगून येत नाही. काळ कोणाची वाट पाहत नाही. आयुष्य कोणाला दुसरी संधी देत नाही.
मग मनात रुसवा ठेवून काय मिळणार? अबोल्यातून काय उरणार?
आपण बोलत नाही, भेटत नाही, माफ करत नाही. तेव्हा आपण नातं हरवतो पण सर्वात मोठं म्हणजे आपण स्वतःला हरवतो.
म्हणूनच राग असेल तर व्यक्त करा. गैरसमज असेल तर स्पष्ट करा. प्रेम असेल तर बोला… क्षमा मागायची असेल तर कचरण्याची गरज नाही.
कारण आयुष्य थांबत नाही. पण न बोलल्याचं दुःख मात्र आयुष्यभर सोबत राहतं.
म्हणून जा… ज्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना फोन करा, मनातलं सांगा, प्रेम व्यक्त करा, रुसवा सोडा.
कारण उद्याचा काही भरोसा नाही पण तुमच्या आजच्या शब्दाने कुणाचं तरी आयुष्य बदलू शकतं… आणि तुमचंही...!!!
प्रा.दिलीप आनंदराव जाधव, सांगली.
सचिव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,सांगली.
राज्य कोषाध्यक्ष
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.

0 Comments