Advertisement

Breaking News
Loading...

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हे शाखेची धडक; अवैध दारू रॅकेटवर कडक कारवाई, साडे चार लाखांहून अधिकचा मुद्देमाल नष्ट-जप्त...


 

सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज प्रतिनिधी:

सोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शहरात अवैध दारू निर्मिती, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी सोलापूर शहर गुन्हे शाखेने प्रभावी व कडक कारवाई करत अवैध दारू व्यवसायावर मोठा घाव घातला आहे. या कारवाईत विविध ठिकाणी छापे टाकून सुमारे ४ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल नष्ट व जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी गुन्हे शाखेकडील सहायक पोलीस निरीक्षक (स.पो.नि.) शैलेश खेडकर व त्यांच्या तपास पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सलगरवस्ती पोलीस ठाणे हद्दीतील मौजे कवठे येथे छापा टाकण्यात आला. येथे कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण यांच्या शेतात सुरू असलेल्या अवैध हातभट्टीवर कारवाई करत १२८५ लिटर गुळमिश्रीत रसायन व ८० लिटर तयार हातभट्टी दारू, असा ५२,९७५ रुपये किमतीचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. याप्रकरणी संजय गोपीचंद राठोड, कुमार उर्फ बाबू पांडुरंग चव्हाण व प्रियंका कुमार चव्हाण (रा. भोजप्पा तांडा, ता. उत्तर सोलापूर) यांच्याविरोधात सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



तसेच १२ जानेवारी २०२६ रोजी हॉटेल अॅम्बेसिडर ते प्रभाकर महाराज मंदिर रोड येथे कारवाई करत अमोल बाळासाहेब भोसले (रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) याच्याकडून १,०३,६६० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व दुचाकी मोटारसायकल जप्त करण्यात आली असून त्याच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



याच दिवशी गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक (पोउनि.) मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकाने गांधीनगर, अक्कलकोट रोड परिसरात ऑटो रिक्षामधून दारू वाहतूक करणाऱ्या नरेंद्र रामलू कोंडा (रा. गांधीनगर, अक्कलकोट रोड, सोलापूर) याच्यावर कारवाई करत १,३२,५०० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व ऑटो रिक्षा जप्त केली. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दरम्यान, गुन्हे शाखेकडील स.पो.नि. शंकर धायगुडे व त्यांच्या तपास पथकाने कर्णिक नगर येथील स्वतंत्र सैनिक रिक्षा स्टॉपजवळ कारवाई करत संदिप विष्णू शिंदे (रा. दहिटणे, सोलापूर) याच्याकडून १,१२,८८० रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व मोटारसायकल जप्त केली असून तसेच गोल्ड वाईन शॉप, अशोक चौक, सोलापूरचे मालक यांच्याविरोधातही जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


ही संपूर्ण कारवाई मा. श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. शंकर धायगुडे, स.पो.नि. शैलेश खेडकर, पोउनि. मुकेश गायकवाड व गुन्हे शाखेच्या तपास पथकातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.


आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा सोलापूर शहर पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Post a Comment

0 Comments