Advertisement

Breaking News
Loading...

सोलापूर जिल्ह्यातील ऊस बिलांवरून संताप; 21 फेब्रुवारीला अनिल पाटलांचा आत्मदहनाचा इशारा...

 


मोहोळ | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :

मोहोळ तालुक्यातील शिरापूर (सो) येथील डिजीटल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अनिल अबाजी पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सन 2025-26 च्या गळीत हंगामातील थकीत ऊस बिलांच्या प्रश्नावरून तीव्र भूमिका घेतली आहे. संबंधित साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत बिले तात्काळ अदा न केल्यास दिनांक 21 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्रात कोठेही आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.



याबाबतचे निवेदन मा. साखर आयुक्त, पुणे, मा. जिल्हाधिकारी सोलापूर, मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर) सोलापूर, मा. पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण तसेच विशेष शाखा सोलापूर यांना देण्यात आले आहे.



निवेदनात म्हटले आहे की, ऊस कारखान्यांकडे गळीतास गेलेल्या ऊसाचा पहिला हप्ता एफ.आर.पी. नियमांनुसार 14 दिवसांच्या आत देणे बंधनकारक असताना अनेक कारखाने नियमानुसार पैसे देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर बँका व पतसंस्थांचे कर्ज वाढत असून सिव्हील स्कोअर खराब होत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मुलींची लग्ने जवळ आलेली असून त्यांचा खर्च ऊस बिलांवर अवलंबून आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना वारंवार आंदोलने व निवेदने देऊनही दिलासा मिळालेला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

तसेच, 21 फेब्रुवारी रोजी आत्मदहनावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास मा. साखर आयुक्त तसेच संबंधित साखर कारखान्यांच्या चेअरमन यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवेदनासोबत सोलापूर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांच्या थकीत ऊस बिलांची यादीही जोडण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्ह्यातील साखर उद्योग व प्रशासनात खळबळ उडाली आहे.



Post a Comment

0 Comments