मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या वतीने आयोजित व्यवसायिक व स्वयंरोजगार संवाद बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
यावेळी उद्योजक, व्यापारी, महिला व युवकांशी सविस्तर संवाद साधत स्थानिक उद्योग, व्यवसाय आणि रोजगार निर्मितीच्या संधींबाबत चर्चा केली. मंद्रूप ही ४० गावांची प्रमुख बाजारपेठ असल्याने स्थानिक संसाधने, कौशल्ये आणि पारंपरिक व्यवसायांच्या बळावर आर्थिक विकासाला चालना देण्याची गरज अधोरेखित केली.
महिला उद्योजक घडविणे, युवकांना स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे, लघुउद्योगांना प्रोत्साहन देणे तसेच स्थानिक उत्पादनांना राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व्यापक व्यासपीठ उभारण्याबाबत सकारात्मक विचारमंथन झाले. व्यवसायासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रशिक्षण, विपणन सुविधा, आर्थिक सहाय्य आणि विविध महामंडळांमार्फत कर्जपुरवठ्याच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा केली. स्थानिक उद्योगांच्या माध्यमातून मंद्रूप परिसराला रोजगारनिर्मितीचे सक्षम केंद्र बनविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, उद्योजक, व्यापारी, महिला, युवक तसेच मंद्रूप परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 Comments