बाळगी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर :
सोलापूर बसस्थानकावरून भंडारकवठे मार्गे बाळगी गावाकडे येणारी एसटी नियोजित वेळेत न येणे, तसेच बाळणी येथे न थांबवता थेट सोलापूरला परत जाणे यामुळे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
दलित सामाजिक कार्यकर्ते रमेश शरणप्पा वाघमारे (बाळगी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार, सोलापूरहून दुपारी ३ वाजता सुटणारी व सायंकाळी ५ वाजता बाळगी येथे पोहोचणारी एसटी अनेकदा गावात न येता भंडारकवठे येथेच थांबवली जाते. त्यामुळे शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी, बाजारासाठी जाणारे नागरिक आणि ज्येष्ठ प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी तक्रारदार यांच्या मुलाने प्रवास करत असताना चालक व वाहक यांनी भंडारकवठे येथे उतरविल्याचा आरोपही सदर निवेदनात करण्यात आला आहे. संबंधित बस क्रमांक MH 14 BT-5026 असा नमूद करण्यात आला आहे. तसेच यापूर्वीही MH 13 CU-6851 या क्रमांकाची एसटी बाळगी गावात न आल्याचे निवेदनात म्हटले आहे.
विशेष म्हणजे, याबाबत अधिकृत तक्रार नोंदवण्यासाठी चालक-वाहकांकडे तक्रार पुस्तकाची मागणी केली असता ते देण्यास नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे.
तक्रारदाराने चालक-वाहकांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच एसटी डेपो नियंत्रण करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून नियमानुसार सेवा सुरळीत करावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधित एसटी विभागाने तातडीने चौकशी करून प्रवाशांना नियमित व वेळेवर सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.





0 Comments