इंगळगी | हॅलो रिपोर्टर न्यूज |मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर:
इंगळगी (ता. दक्षिण सोलापूर) येथे मंगळवारी (२४ फेब्रुवारी) दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. कौटुंबिक वादातून ३५ वर्षीय जावयाने आपल्या ५५ वर्षीय सासऱ्याची उसाच्या शेतात चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने स्वतःवरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.
मृत व्यक्तीचे नाव सिकंदर मुलका शेख (वय ५५, रा. इंगळगी) असे असून आरोपी जावयाचे नाव सादिक दफेदार (वय ३५, रा. पानमंगरुळ, ता. अक्कलकोट) असे आहे.
वादातून टोकाचा निर्णय:
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी दुपारी इंगळगी येथील उसाच्या शेतात सादिक दफेदार आणि त्याचे सासरे सिकंदर शेख यांच्यात काही कारणावरून वाद झाला. हा वाद इतका चिघळला की, संतापाच्या भरात सादिकने आपल्या जवळील धारदार चाकूने सासऱ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या सिकंदर शेख यांचा जागीच मृत्यू झाला.
आरोपीची आत्महत्येचा प्रयत्न:
सासऱ्याची हत्या केल्यानंतर सादिक दफेदार याने त्याच चाकूने स्वतःच्या शरीरावर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
पोलिस तपास सुरू:
घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलिस ठाणे येथील अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून, या हत्येमागील नेमके कारण काय होते याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे.
या रक्तरंजित घटनेमुळे इंगळगी व परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


0 Comments