मंद्रूप | हॅलो रिपोर्टर न्यूज | प्रतिनिधी मल्लिकार्जुन कांबळे : मंद्रूप येथून पवित्र तीर्थक्षेत्र श्रीशैलमकडे दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिभावाने पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज पालखीचे विधिवत प्रस्थान झाले. गावातील भाविक, वारकरी आणि शिवभक्त मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पायी मार्गस्थ झाले.
या पदयात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे पालखी नेण्यासाठी विशेष रथाची निर्मिती करण्यात आली असून सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या रथात पालखी विराजमान करून भक्तगण “हर हर महादेव” व “श्रीशैल मल्लिकार्जुन महाराज की जय” अशा जयघोषात मार्गक्रमण करत आहेत.
दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती तथा माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेली तब्बल चाळीस वर्षे ही पवित्र परंपरा अखंड सुरू असून दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक सहभागी होतात.
श्रीशैलम मल्लिकार्जुन मंदिर हे भगवान मल्लिकार्जुन (भगवान शंकर) यांचे प्राचीन ज्योतिर्लिंग क्षेत्र असल्याने या पदयात्रेला विशेष धार्मिक महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा संदेश देत भाविक भगवान शंकराच्या दर्शनासाठी पायी प्रवास करत आहेत.
पालखी प्रस्थानावेळी ग्रामस्थांनी पूजा-अर्चा करून भाविकांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण परिसर शिवमय झाला असून भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण अनुभवास येत आहे.


0 Comments