नरखेड|हॅलो रिपोर्टर न्यूज|निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर:
नरखेड जिल्हा परिषद गट क्रमांक २४ मधील अपक्ष उमेदवार अनिल आबाजी पाटील (चिन्ह – नारळ) यांनी प्रचंड बहुमताने विजय करून देण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. नेतेमंडळी निवडणुकीपुरते येतात, मोठी आश्वासनं देतात आणि नंतर पाच वर्षे गायब होतात—हा अनुभव जनतेने वारंवार पाहिल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या कामाचा स्पष्ट आराखडा मांडताना पाटील म्हणाले की, नरखेड जि.प. गटातील घरकुलांना मंजुरी मिळून दोन-अडीच वर्षे झाली असतानाही वाळूअभावी कामे रखडली आहेत. त्यामुळे प्रत्येक घरकुलधारकाला पाच ब्रास वाळू मोफत देण्यात येईल, ही त्यांची पहिली प्राथमिकता असेल. तसेच, जागा नसल्याने गायरानावर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या नागरिकांची घरे नियमित करून सातबारा उतारा मिळवून देण्याची स्वतः हमी त्यांनी दिली.
लाईटचे प्रश्न, भूमि अभिलेख कार्यालय, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनशी संबंधित शासकीय कामे—कायद्याच्या चौकटीत बसणारी सर्व कामे तात्काळ मार्गी लावली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पांदण रस्ते, शिव रस्ते व इतर रखडलेली रस्त्यांची कामेही तात्काळ सुरू केली जातील. “हे फक्त आश्वासन नाही; पुढील पाच वर्षांत पूर्तता करून दाखवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आपण सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेला कार्यकर्ता असून ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण असल्याचे सांगत, प्रत्येक गावाला वर्षातून किमान दोन वेळा दौरे करून नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. “मत दिले नाही तरीही मी जनतेची सेवा करत राहीन,” असेही ते म्हणाले.
मतदारांना पैशांचे आमिष व खोटी आश्वासने दिली जातील; त्याला बळी न पडता विकासासाठी मतदान ‘नारळ’लाच करा, असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री, पालकमंत्री हे कोणत्याही एका पक्षाचे नसून सर्वसामान्य जनतेचे असतात; त्यामुळे कोणत्याही मंत्र्याकडे जाऊन जनतेची कामे पूर्ण करण्यास मी सदैव तत्पर राहीन.
अखेर, दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व नागरिकांनी मतदान करूनच आपल्या कामांसाठी पुढे यावे, असे हात जोडून आवाहन करत त्यांनी सांगितले—“विचार पक्का करा आणि नारळावर शिक्का मारा.”


0 Comments