Advertisement

Breaking News
Loading...

रविवारचा चहा क्रमांक- २०३ संवाद हरवलायं...?

 


रविवारचा चहा क्रमांक- २०३


संवाद हरवलायं...?


कामाच्या निमित्तानं बसचा  काही तासांचा प्रवास. बस स्थानकावरची लगबग सोडली, तर सबंध प्रवासात बसमध्ये एक भयावह शांतताच होती. कुणीच कुणाशी बोलत नव्हते. माझ्यासहित सारे प्रवासी आपापल्या मोबाईल मध्ये गुंग. सहजच लक्षात आले, की बसमधील सारी माणसं सोबत आहेत, परंतु हा सहप्रवास नाही.मला  लहानपणी आजीसोबत केलेला प्रवास आठवला. एसटीत शेजारच्या प्रवाशाचे नाव, गावं, पत्ता या सगळ्या सोबतच एकमेकांकडे असलेल्या चटणी भाकरीच्या शिदोरीचीही देवाणघेवाण व्हायची. तसा प्रवास आता नाही. आज तासन् तास माणसं सोबत आहेत, पण शब्दही बोलत नाहीत. संवाद आज हरवला आहे.


गावातल्या वीरभद्र मंदिराच्या पारावर वयोवृद्ध माणसांची ओळ बसलेली आहे.गाव गाड्यातल्या  कट्ट्यावर तरुणांच्या गप्पा चालल्या आहेत, लहान मुलं खेळताहेत. वडीलधाऱ्यांची मंदिरात ये-जा चालू आहे. हे लहानपणी गावात अनुभवलेलं दृश्य आता गावातही दुर्मीळ झाले आहे. माणसं माणसात बसत नाहीत. माणसं माणसांशी बोलत नाहीत. शेतातून आलेली, कामावरून आलेली माणसं आपापल्या घरात बसतात. आपला मोबाइल उघडतात, आणि त्यातील सोशल मीडियावर दंग होऊन जातात. तरुण मुलांना फेसबुकवर हजारो फ्रेंड आहेत. पण घरात फेस-टू-फेस आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. व्हॉट्सऍपच्या शेकडो ग्रुपमध्ये असूनही माणूस एकटाच आहे. घरातही माणसं एकमेकांशी किती बोलतात हा सुद्धा प्रश्नच. कुटुंबात सुद्धा माणसं एकमेकांशी संवाद करत नसतील तर घरं फक्त जेवण करून झोपण्याची ठिकाणे म्हणजे लॉजिंग बोर्डिंग तर होत नाहीत ना?


संवाद नसेल तर ही नाती टिकणार कशी, नाती नाही तर पुढे जाऊन या कुटुंबसंस्थेचे काय, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. आपले मित्र, आप्तेष्ट यांचा मोबाइलनंतर आपल्याकडे आहे. आपलाही त्यांच्याकडे आहे. एकमेकांचे स्टेटस, त्याला रिप्लाय, शुभेच्छा इमेजेस, काही निमित्ताने मेसेज हे सगळं म्हणजे आपण एकमेकांच्या संपर्कात आहोत. संपर्क आहे पण संवाद नाही. संपर्कात केवळ माहिती मिळते पण संवादात शब्दांसोबत आपलेपणाची भावनाही असते. ती या सोशल मीडियावरील संपकनि कमी झाली. दुःखात असलेल्या एखाद्या मित्राला व्हॉट्सॲपवर रडणाऱ्या चार इमोजी पाठविण्यापेक्षा त्याला प्रत्यक्ष भेटून, क्षणभर त्याच्या खांद्यावर हात ठेवून दिलेला आधार खूप महत्त्वाचा असतो. एकही शब्द न बोलता केवळ त्या स्पर्शातून होणारा संवाद ही मनुष्यप्राण्याची खरी ओळख आहे. संवाद मनापासून मनापर्यंत पोहोचतो. मनाला आधार देतो, संवादातून आपल्या दुखाला वाट मोकळी करून देता येते. नेमका तोच संवाद या समाज माध्यमांच्या अतिरिक्त वापरामुळे हरवला आहे. यात दोष मोबाइल सारख्या साधनांचा नाही तर ती साधने वापरणाऱ्या माणसांचा आहे. याचा आपण माणसांनी विचार करूया.


 प्रा.दिलीप आनंदराव जाधव, सांगली

                   सचिव

 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, सांगली.

              राज्य कोषाध्यक्ष

 कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments