Advertisement

Breaking News
Loading...

बोरामणीत 1 मे रोजी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा संपन्न; आचलारे मित्र परिवाराचा सामाजिक उपक्रम...

 


बोरामणी | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर : अक्कलकोटचे माजी आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आचलारे मित्र परिवारातर्फे शुक्रवार, 1 मे 2026 रोजी सायंकाळी 6.32 वाजता गोरज मुहूर्तावर बोरामणी येथे भव्य सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न झाला. यंदा या सोहळ्यात 5 जोडप्यांचा विवाह पार पडला.


या उपक्रमाबाबत माहिती देताना मुख्य संयोजक तथा पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश आचलारे यांनी सांगितले की, म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमातून आतापर्यंत तब्बल 273 जोडप्यांचे विवाह पार पडले आहेत.

या सोहळ्यात बोलताना काशी पीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “समाजासाठी केले जाणारे हे कार्य अत्यंत पुण्याचे असून, अशा सामाजिक उपक्रमांना आमचा सदैव पाठिंबा राहील,” असे प्रतिपादन केले.

यावेळी सिद्धाराम म्हेत्रे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “दरवर्षी 8 एप्रिल रोजी वाढदिवसानिमित्त हा सोहळा आयोजित केला जातो; मात्र यंदा काही कारणास्तव 1 मे रोजी आयोजन करण्यात आले. योगायोगाने हाच दिवस माझ्या लग्नाचा वाढदिवस असल्याने हा क्षण अधिक खास ठरला.”

खासदार ज्योतीताई वाघमारे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, “गोरगरिबांच्या हितासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम पुढेही अखंड सुरू राहावा,” अशी अपेक्षा व्यक्त केली.

तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांनी आचलारे यांच्या कार्याचे कौतुक करत, “अन्नदान, रक्तदानासोबत कन्यादान हेही अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कार्य असून, अशा उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जातो,” असे सांगितले.

या विवाह सोहळ्यात सहभागी वधू-वरांना हळदीचे कपडे, वधूस शालू, मणी-मंगळसूत्र व सौभाग्य अलंकार, तर वराला सफारी पोशाख देण्यात आला. तसेच सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, विवाहानंतर पहिली मुलगी झाल्यास तिच्या नावाने बँकेत ₹5,000 ची ठेव करण्याची अभिनव योजना राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमास अमर पाटील, प्रथमेश म्हेत्रे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य शिवराज म्हेत्रे, आनंद तानवडे, सुनिल बनसोडे, बाळासाहेब वाघमारे, केदार उंबरजे तसेच बोरामणी जिल्हा परिषद गटातील प्रतिष्ठित व्यक्ती व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आपल्या परिसरातील विश्वासार्ह बातम्यांचे व्यासपीठ...

बातम्या / जाहिरातीसाठी संपर्क:

डॉ. राजदत्त रासोलगीकर

मुख्य संपादक

मो. 9923393329

आपली बातमी, आपला आवाज – थेट जनतेपर्यंत...!

Post a Comment

0 Comments