दक्षिण सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज |निवडणूक विशेष वृत्तांकन डॉ राजदत्त रासोलगीकर:
दक्षिण सोलापूर पंचायत समितीवर सलग दुसऱ्यांदा भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित करत १२ पैकी तब्बल ११ जागा जिंकल्या आहेत. उर्वरित एकमेव जागा शिवसेना शिंदे गटाच्या खात्यात गेली असली, तरी सत्तेची सूत्रे भाजपकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता तालुक्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीकडे लागले आहे.
सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्याने मंद्रूप गणातून विजयी झालेले मळसिद्ध मुगळे यांचे नाव आघाडीवर मानले जात आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिलेल्या संधीचे सोने करत मुगळे यांनी विजय मिळवला. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कामाचा अनुभव आणि संघ स्वयंसेवक म्हणून कार्य यामुळे त्यांची संघटनात्मक पकड भक्कम मानली जाते. पक्षांतर्गत काही विरोध असला तरी आमदारांचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दुसरीकडे उपसभापतीपदासाठी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील कासेगाव गणाचे विजय राठोड आणि कुंभारी गणाचे सूरज पाटील यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विजय राठोड हे स्व. उमाकांत राठोड यांचे बंधू असून त्यांच्या माध्यमातून बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
राजकीय समतोल साधण्यासाठी दक्षिण सोलापूर मतदारसंघाला सभापती तर अक्कलकोट मतदारसंघाला उपसभापतीपद देण्याचे गणित मांडले जात आहे. दोन्ही पदे अडीच वर्षांसाठी असणार असून त्यानंतरच्या आरक्षणावर पुढील सत्तासमीकरणे अवलंबून राहणार आहेत.
एकंदरीत, भाजपच्या प्रचंड बहुमतानंतर आता “कोणाच्या गळ्यात पडणार सत्तेची माळ?” याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत या राजकीय समीकरणांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.



0 Comments